________________
सांजवात डोळे कितीही छोटे असले तरीही त्यात एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते. आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे, जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी! डोळ्यात न मावणाऱ्या या अफाट जगात डोळ्यासमोर घडणाऱ्या अगदी साध्या साध्या प्रसंगात आपलं विश्व बदलून टाकण्याची ताकद असते. आपलं अंतर्मन एका क्षणात आर्ततेने चिंब ओले होते! आपला स्वभाव, आपलं वागणं एवढचं काय आपलं सारं आयुष्य बदलून टाकण्याचं प्रचंड सामर्थ्य एखाद्या नेहमीच्याच डोळ्यासमोर घडणाऱ्या प्रसंगातून सुद्धा एखाद्याच्या जगण्याला विश्वव्यापी गहिरा रंग देऊन जातं! गौतम बुद्धांचं उदाहरण यासाठी पुरेसं आहे. आपापल्या घरी आनंद, सुख-समाधान असणं, निर्माण करणं हे एक जीवनकार्यच असतं आणि एखाद्याच्या आदर्श जगण्यातनं समाज ढवळून काढण्याचं कार्य घडतं आणि सारा समाज स्वच्छ होऊन जातो. जगण्याला अर्थ निर्माण होतो, लक्ष्य निर्माण होतं आणि खुमारी येते. त्याचेच साद पडसाद म्हणजे 'तरंग-अंतरंग ' मी अशा घराकडं, घरातल्या माणसाकडं पहातो, त्यांच्याविषयी वाचतो, तेव्हा साध्या साध्या गोष्टीतून मिळणारं समाधान सारं घर उजळून टाकत असतं हे लक्षात येतं. आणि मग मला घरातलं देवघर आठवतं. संध्याकाळी घरातल्या साऱ्यांनीच परत घरी यावं. बहुदा त्यासाठीच पूर्वी झाडलोट करून घर स्वच्छ करून तुळशीपुढं दिवावात करण्याची, पुढचं दार उघडं ठेवण्याची आग्रही प्रथा होती. सुख-समाधान घेऊन लक्ष्मी यावी ही सदिच्छा होती. त्याचवेळी देव्हाऱ्याशेजारच्या चकचकीत स्वच्छ समईतली सांजवात एक अतिशय मंद, परंतु सारा आसमंत चंदनाच्या अगरबत्तीच्या सुगंधाबरोबर पावन करून टाकते, उजळून टाकते. माझ्या मनात आपल्या आज हयात नसलेल्या वाडवडिलांच्या आठवणी या अशा सांजवातीच्या उजेडाने उजळून निघतात ! मला सहज सुचणारं मनोगत मी माझ्या मर्यादित लेखन सामर्थ्याच्या सोबतीने लिहायचा हा प्रयत्न आहे. उजेडामुळे दुःख हे काही काळाने सुखात परावर्तित होते, आनंदी रहाण्याची इच्छा निर्माण होते. या पुस्तकाची छपाई, रचना मांडणी ही सर्वोत्कृष्ट व्हावी यासाठी धडपडणारी 'चतुरंग'ची टीम ही माझी घरचीच असल्यामुळे त्यांचे आभार मानणे फारच औपचारिकता होईल. परंतु हे जे काही आपणापुढे आले आहे ते केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे हे मात्र निश्चित. या पुस्तकाच्या मुखपृष्ठाची जबाबदारी श्री. सुरेश पंडित यांच्यासारख्या ख्यातनाम चित्रकाराने उचलून मला कृतकृत्य केले आहे. त्यांचा मी ऋणी आहे. तसेच या पुस्तकाचे सुबक मुद्रण करुन वेळेवर आपल्यापर्यंत पोहचवल्याबद्दल सुनिल प्रिंटेक्सचे श्री. सुमेध शहा यांच् सर्व टीमचे मनःपूर्वक आभार! वाचकांना सांजवातीचा स्वच्छ मोकळा उजेड अनुभवाला येऊ दे एवढीच या 'तरंग अंतरंग'च्या निमित्ताने ईश्वराकडे प्रार्थना ! हे वेळोवेळी केलेलं पण विस्कळीत असलेलं लेखन वाचकांना वाचताना सुलभ वाटावे म्हणून त्यातील कथा व ललित लेख 'तरंग' या विभागात तर 'अंतरंग' या विभागात माझे व्यक्तिगत अनुभव, माझ्या जिव्हाळ्याच्या माणसांची व्यक्तिचित्रे यांचा समावेश आहे. • अनिल नारायण कुलकर्णी