पान:ज्ञानदीप अथवा सुबोध गद्यरुप ज्ञानेश्वरीसार.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सहावा ] अभ्यासयोग. ७१ दिव्य भोग यथेच्छ भोगीत असतांहि तो कंटाळतो, आणि पश्चात्ताप करतो. नंतर तो मृत्युलोकीं अत्यंत धर्मशील व नीतिमार्गानें चाल- णाऱ्या कुळांत जन्म घेऊन शास्त्राप्रमाणें स्वधर्माचरण करतो, सारासार विचार सदैव जागृत ठेवतो, ईश्वरावांचून दुसऱ्या कशाचें चिंतन करीत नाहीं, आणि अशा प्रकारें पुण्य जोडीत सुखानें राहतो. किंवा ज्ञानसंपन्न, ब्रह्मनिष्ठ, आत्मानंदांत निमग्न, संतुष्ट, विवेकशील अशा एखाद्या योग्याच्या कुळांत तो जन्म घेतो. तेथें त्याचें आत्मज्ञान बाळपणांतच स्फुरतें, आणि सर्वज्ञता अंगीं येते. सर्व विद्या आणि शास्त्रे तो स्वभावतःच पाठ म्हणतो. ज्या जन्माची देवसुद्धां इच्छा करतात व तत्प्रीत्यर्थ जप, होमादि करतात, असा जन्म त्याला प्राप्त होतो. नंतर मागील जन्मांतल्या मरणकाळच्या बुद्धीच्या मर्यादेच्यापुढे अमर्याद अशी नवी बुद्धि त्याला प्राप्त होते. असे झालें म्हणजे जसा एखादा भाग्यवान् पायाळू माणूस असून त्याच्या डोळ्यांत दिव्यांजन घातलें गेल्यावर तो भूमिगत गुप्तधन पाहूं शकतो, तशी जे गूढ सिद्धान्त केवळ गुरूपदेशानेंच कळावयाचे ते सिद्धांतसुद्धां या पुरुषाची बुद्धि जाणूं शकते. बलवान् इंद्रियें त्याच्या स्वाधीन होतात, मन प्राणवायूशीं एकजीव होतें, आणि प्राणवायु चैतन्यस्वरूप आकाशाशीं समरस होऊं लागतो. अभ्यासा- वांचूनच त्याची समाधि लागते. असा पुरुष म्हणजे जणूं काय योग- स्थळाची अधिदेवता, किंवा वैराग्याची प्रत्यक्ष मूर्तिच! दिसण्यांत जरी तो साधक दिसला, तरी तो जणूं काय सिद्धांच्याच समुदायांतून काढिला असा भासतो.