पान:जॉयस्टिक.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाड होऊया... झाड जुई आणि चिनार यांची अगदी घट्टमुट्ट मैत्री होती. अमोरासमोरच घरं होती त्यांची. शाळेत दोघंही बरोबरच जायची. शाळेतून आल्यावर कडाड्काड असा आवाज होऊन पोटात भूक लागलेली असायची... मग ज्या घरी आवडतं काही मिळेल तिथंच मस्त ताव मारायचा... कधी जुई चिनारकडे तर कधी चिनार जुईकडे हे ठरलेलंच. संध्याकाळी जुई गाण्याच्या क्लासला जायची तर चिनार हार्मोनियमच्या क्लासला जायचा... मात्र क्लासहून येताना दोघंही एकमेकांना सोबत करायची. घरी आल्यावर 'पाचच मिनिटात येतो' म्हणून दोघंही चिंचेच्या झाडांपलीकडे असणाऱ्या छोट्या बागेत खेळायला पळायची. फक्त झोके घेऊ असं ठरवलं असलं तरी घसरगुंडी व्हायचीच, सी-सॉ चुकवायला तर आवडायचाच नाही... मग बाकीचं मित्रमंडळ पाहिल्यावर थोडी लपाछपी किंवा पकडापकडी असं खेळल्याशिवाय काही मजाच नाही ना ! नंतर घरातून हाका आल्या की धूम पळत आपापल्या घरी जायचं. हात-पाय धुवायचे. देवाला नमस्कार करायचा. त्यानंतर कधी आई तर कधी बाबा अभ्यास करून घ्यायला सुरुवात करायचे... अभ्यास संपवून जेवायचं तर शेवटचे काही घास ताटात राहिलेले असतानाच जाम झोप यायला लागायची. अंथरुणावर पडेपर्यंत दम काही निघायचा नाही. आणि झोपतोय तोवर चिमणीची चिवचिव, मांजरीची म्याव म्याव आणि आईबाबांच्या हाका ऐकून उठायचं... मग दात घासणं, दूध पिणं, अंघोळ, राहिलेला असेल तर अभ्यास किंवा शाळेतून करायला आणलेलं इतर काम इतक्यात साडेनऊ वाजायचेच. मग पटकन जेवायचं की शाळेला पळायचं! असं रोजचंच झालं होतं चिनार आणि जुईचं. जुई आणि चिनार शहाणी मुलं होती. शेजारचेही आपल्या मुलांना सांगायचे की, “बघा... बघा... किती शहाणी मुलं आहेत. आईबापाला दमवत नाहीत. अभ्यास करतात. उलटं बोलत नाहीत." खरं तर अशा कौतुकाचा कुणालाही आनंदच होतो, झाड होऊया... झाड । १