पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/82

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘लोकमत समाचार'च्या निमित्ताने...

 २० ऑगस्ट २००६. कोल्हापूर-सांगली परिसरात एका नव्या युगाची सुरुवात झाली. लोकमत वृत्तसमूहाने लोकमत समाचार'या हिंदी दैनिकाचा प्रारंभ केला. या परिसरात हिंदी नवी नाही. कोल्हापूर संस्थानचा देवासारख्या हिंदी बाहुल संस्थानाशी असलेला संबंध सर्वपरिचित आहे. इथे मराठ्यांचं राज्य व गादी असली तरी सोयरिक हिंदी राजे, सरदार, उमरावांशी होत राहिल्याने दरबारातही हिंदी बोलण्याची परंपरा होती. छत्रपती शिवाजी महाराजांना तर ‘भूषण' नावाच्या हिंदी कवीस ‘राजकवी' म्हणून मान्यता नि आश्रय दिला होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळात इथं आर्य समाजास आश्रय मिळाला. तिथं अनेक आर्य समाजी हिंदीभाषी साधू-संत अनुयायी येत. त्यांनी तर इथं चक्क मोफत हिंदी वाचनालय चालविलं होतं. कोल्हापूरचा आजचा ‘श्रद्धानंद हॉल' पूर्वीच्या हिंदी प्रचारप्रसाराचे केंद्र होतं, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल.
  कोल्हापूर-सांगली परिसरात हिंदी पत्र-पत्रिका निघण्याची परंपराही जुनी आहे. कोल्हापूरजवळच असलेल्या गांधीनगरहून श्री. नोतानी हे ‘देशनूर' नावाचं हिंदी साप्ताहिक काढायचे. मी त्यात काही काळ लिहिल्याचं आठवतं. सांगलीच्या डॉ. गो. रा. कुलकर्णी यांनी 'संबंध' नावाचं भारतीय साहित्यविषयक त्रैमासिक काढलं होतं. त्यातही मला लिहिल्याचं आठवतं पण दैनिक सुरू झाल्याचं ऐकिवात नाही. त्यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली परिसरात अवघ्या दक्षिण महाराष्ट्राचं पहिलं हिंदी दैनिक होण्याचा मान ‘लोकमत समाचार'नं मिळविला आहे. त्याचं स्वागत नि अभिनंदन

जाणिवांची आरास/८१