पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जयभीम गीतमाला, ‘जयभीम' गीतधारा (भाग एक ते नऊ), क्रांतिसूर्य (पोवाडा), देशभक्त अण्णा (पोवाडा), दलितांचा राजा शाहू (पोवाडा), घटनेचे मारेकरी (काव्यसंग्रह), अण्णाभाऊ साठे : काव्यमय जीवन दर्शन (रूपक पोवाडा), कामगारांची आजची समस्या (पुरस्कारप्राप्त), शाहूराजे (खंडकाव्य) या प्रकाशित रचनांशिवाय ‘सुरा अन्यायाचा' हे नाटकही त्यांनी लिहिलंय. ते प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहे. परवा ते घरी जयभीम गीतधारेचा नववा भाग देऊन गेले. येथील प्रज्ञा प्रकाशनाच्या प्रा. शरद गायकवाड नावाच्या संवेदनशील प्राध्यापकांनी स्वतःचा खिसा फाटका असताना ते छापलं, याची विशेष नोंद घ्यायला हवी. आज हे सारं पाहायला शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, अण्णाभाऊ असायला हवे होते. कचरा कोंडाळ्यातील घाण उपसत घाम गाळून काव्य करणारा हा शाहीर त्याला त्याचं कलासक्त मन स्वस्थ बसू देत नाही. त्यांच्या काव्यात असतो टाहो नि गुदमरलेल्या किंकाळ्या. या कवीची इच्छा आहे की, ‘फोटो भीमाचा नोटांवर छापावा.' कवीची इच्छा अपूर्ण राहील असे वाटत नाही, पण त्यासाठी एखादा दलित अर्थमंत्री किंवा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर व्हायला हवा. 'कामगार भूषण' असलेल्या विजय शिंदे यांना महापालिकेने ‘कोल्हापूर भूषण' करावं. त्याच्यासाठी अशासाठी तरी कोल्हापूर भूषण पुरस्कार परत सुरू होईल, अशी आशा करुया. कोल्हापूरसारखंं रत्नपारखी शहर नाही, असा माझा दावा फोल ठरणार नाही, अशी आशा आहे. उद्या आंबेडकर जयंती. त्यावेळी या झाडू कामगार साहित्यिकाचा गौरव करुया. दुधाची तहान ताकावर भागवणं तर आपल्याच हातात आहे ना! तेच खरं बाबासाहेबांचं स्मरण होईल!

***

जाणिवांची आरास/४४