पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कॉफी हाऊस

मध्यंतरी मला छोट्या-छोट्या तीन ओळींच्या जपानी काव्यप्रकार ‘हायकू'नी वेड लावलं होतं. शांता शेळके या मराठी कवयित्रींनी अशा सुंदर हायकू लिहिण्याचं ऐकल्यावरून शोधून वाचल्या होत्या. त्यापैकी खालील हायकू मला समजलं नव्हतं.
 ‘कॉफी हाऊस,
 प्रत्येक टेबलावर,
 नवा पाऊस.'

 अन् परवा अचानक ते उमगलं. मी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या एका बैठकीसाठी म्हणून अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठात गेलो होतो. बैठक सुरू होण्यास वेळ होता म्हणून विद्यापीठ पाहात चौकात आलो. तर तिथल्या 'कॉफी डे' या कॅफेकडे माझं लक्ष वेधलं, ते तिथल्या तरुण तितली नि फुलपाखरांनी ! प्रत्येक टेबलावर तरुण कबुतरं गुटरगू करत होती. तिथल्या सगळ्या तड़क-भड़क इंद्रधनुष्यात या पांढऱ्या कबुतरानं कोपऱ्यातलं बिनपावसाचं टेबल पकडलं नि कॉफी हाऊसच्या आतला नि बाहेरचा ऊन-पाऊस मनमुराद कॉफीचे घुटके घेत पाहणं पसंत केलं. इथलं मेनूकार्डही मोठं रोमँटिक, त्याचं नावच होतं 'मेल्टिंग मोमेंट्स' (विरघळणारे क्षण!) इथल्या कॉफीच्या खुमारी नि वाफेत जो विरघळून जाणार नाही तो विरळा! हे नुसतं कॉफी हाऊस नव्हतं. ते 'गिफ्ट शॉप'ही होतं. लैला-मजनू इथं टीशर्ट, कॅप, जीन्स, टॉप, फिलिंग्ज कार्डस, परफ्यूम्स, मग, किटली, पेन, सॅग्ज, सीडीज खरेदी करून एकमेकांस भेट देत होती नि सात क्षणांच्या (जन्मांच्या नव्हे!) जिंदगीवर जान देत होती.

जाणिवांची आरास/३३