पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 उरते. सांबऱ्याला त्या दिवशी पोलीस छावणीचे रूप होते. ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. दिंडीत बेंजो, झांजपथक, लेझीम पथक, चित्ररथ, वारकरी दिंडी, शाळकरी मुलांचे वाचन संस्कृती पथक, काय नव्हतं? ग्रंथपालखीचा सारा मार्ग शेणसड्यानं सारवलेला, त्यावर प्रत्येक दारी रांगोळी, ग्रंथ पालखीची घरोघरी आरती, पाय धुणं, प्रसाद वाटप, पुष्पवृष्टी असं डोळे दिपवणारं दृश्य. प्रत्येक घराच्या गच्चीवर बंदुकधारी पोलिसांची गस्त यास दृष्ट लावत असली तरी त्या साऱ्याने तेथील सरकार अस्वस्थ दिसून येत होतं खरं!

 सभामंडपात हजारोंचा जनसमुदाय, तोही मोठ्या प्रतिज्ञा व प्रणाने हजर. उठून जाणं नाही. सूर्य चढेल तशी चढती गर्दी. सूर्य ढळला तरी गर्दी शेवटपर्यंत अढळ होती. चित्रपटगीतकार जगदीश खेबुडकर, गोव्याचे लोककवी विष्णू सूर्या वाघ, प्रबोधनकार प्रा. शिवाजीराव भुकेले, लोककथाकार सुरेखा मिसाळ साऱ्यांनी आपापले फड मोठ्या शिताफीने व तडफेने गाजविले. आमराईतले सहभोजन, ग्रंथ दालनातील ‘एक होता कार्व्हर' नि ‘श्यामची आई' चं घरोघरी जाणं या साऱ्यातून मराठी माती नि मन ओसंडून वहात होतं. जिथं पिकतं तिथं विकत नसतं हेच खरं! आपण साऱ्यांनी सीमाबांधवांकडून प्रेरणा घेऊन आपापल्या परिसरात लोकवर्गणीतून मराठी साहित्य संमेलनांचा यज्ञ पेटवून तो जागवायला हवा.

◼◼

जाणिवांची आरास/११८