पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जिथे पुरुषांची संख्या स्त्रियांच्या मानाने अधिक प्रमाणात आहे, तिथे स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचे प्रमाण जादा असते. स्त्रिया काम ज्या ठिकाणी करतात, त्या ठिकाणचे वातावरण किंवा त्या संस्थेचा अशा प्रकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन याही गोष्टी काही वेळा ताणतणावाला कारणीभूत असतात. अनेक संस्थांमध्ये विविध प्रकारच्या कामांसाठी- ऑफिसकामासाठी- स्त्रियांना बाहेर पडावे लागते. या अशा कामाच्या निमित्ताने स्त्रियांचे काही वेळा लैंगिक शोषण होण्याची शक्यता असते. संस्थेने किंवा संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित व्यक्तींची वेळीच कानउघाडणी केली किंवा त्यांच्यावर कारवाई केली तर हे प्रकार तिथल्या तिथे थांबविता येतात. बऱ्याच स्त्रियांना कामाच्या अतिरेकामुळे ताण येतो. कामाची योग्य प्रकारे हाताळणी न केल्यामुळेसुद्धा हा ताण येत असावा. गरोदरपणा, स्त्रीच्या मासिक पाळीच्या तक्रारी किंवा स्त्रीत्वाशी संबंधित असलेली आजारपणे यांचा प्रतिकूल परिणाम बऱ्याचदा कामावर होतो आणि मग कामाचा दर्जा कमी झाला की त्यातून ताण उत्पन्न होतो. कामाच्या ठिकाणचे भौतिक वातावरणदेखील अनेक स्त्रियांच्या ताणतणावास कारण ठरते. कामाच्या ठिकाणी प्रचंड गोंधळ किंवा आवाज होत असेल तर स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे दोन्हीही बिघडतात. बऱ्याच ऑफिस स्त्रियांसाठी वेगळी स्वच्छतागृहे नसतात. स्त्रीपुरुषांसाठी एकच स्वच्छतागृह असेल तर स्त्रियांची कुचंबणा होत असते हे अनेक अभ्यासांत दिसून आलेले आहे. एखादी स्त्री काम करून जे अर्थार्जन करते त्यावरच जर संसार चालला असेल, मिळवती अन्य कोणतीही व्यक्ती घरी नसेल तर स्त्रीने काम करूनदेखील कुटुंबाची आर्थिक ओढाताण चालूच राहते आणि त्याचे रूपांतर सर्वांच्याच ताणतणावात होते. अधिक ताण अर्थातच 'कर्त्या' स्त्रीवर पडतो. नोकरी करणाऱ्या स्त्रीचे मूल लहान असेल तर त्याची व्यवस्था ही एक वेगळी डोकेदुखी असते. कारण अशा मुलाला एक तर पाळणाघरात ठेवावे लागते किंवा त्याला घराबाहेरील 'ती'चा ताण । ९५