पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनात आणले तर इतरांना आनंद देण्याइतकी सोपी गोष्ट दुसरी कोणतीही नाही. आपले बोलणे हे एक आनंदनिर्मितीचे प्रभावी साधन आहे. ही मानवाला लाभलेली दैवी देणगी आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून जरी विचार केला तरी मनुष्यजीव हा सर्व प्राण्यांत श्रेष्ठ जीव आहे आणि फक्त तोच बोलू शकतो. आपण बोलू शकतो ही किती महत्त्वाची आणि भाग्याची गोष्ट! पण बरेच जण हे विसरून गेले आहेत की, याचा फक्त चांगले बोलण्यासाठी, इतरांना आनंद देण्यासाठी वापर करावा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे काही बोलतो, त्यात सतत 'मी'चा उल्लेख असतो. उदाहरणार्थ, मी जेवलो, मी येतो, मी जाणार आहे... पण मी या शब्दाऐवजी तू, तुम्ही, आपण या शब्दांचा वापर दैनंदिन जीवनात वरचेवर केला तर आनंदाला तोटा नाही. कारण, 'तू चांगला आहेस’, ‘वा छान!', 'तुम्ही खूप चांगले वागलात', 'तुमच्यामुळे हे चांगले काम झाले', 'तुम्ही किती त्रास घेता', 'आपण सर्वजण मिळून करू...' हे शब्द वरचेवर वापरले तर ते ऐकणाऱ्यावर आपण आनंदाच्या क्षणांची उधळण करीत असतो. कोणताही खर्च न करता, सहजसाध्य अशी गोड आणि चांगले बोलण्याची कला साध्य केली, लोकांना क्लेश न देता सुखाचे दोन शब्द बोललो तरी कष्टी लोकांचे दुःख हलके होईल. आपण हे करून पाहायला काय हरकत आहे? ६६ । जगण्यात अर्थ आहे..