पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निरोगी शरीर, आनंदी मन माझे तरुण, साहित्यप्रेमी स्नेही डॉ. अनिल मडके हे आपला यशस्वी वैद्यकीय व्यवसाय निष्ठेने सांभाळून अन्य अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांत स्वेच्छेने भाग घेत असतात. आरोग्यविषयक प्रश्नांचा आणि इतर समस्यांचा परामर्श घेण्यासाठी ते 'जनस्वास्थ्य' नावाचे एक मासिक गेली चौदा-पंधरा वर्षे सातत्याने चालवीत आहेत. मासिकाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मासिकाचे ते संपादक आहेत. आतापर्यंत 'जनस्वास्थ्य' मधील त्यांचे निवडक संपादकीय लेखन या संग्रहात एकत्र आले आहे, ते जिज्ञासूंना मार्गदर्शक होईल यात शंका नाही. डॉ. मडके यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण स्वच्छ, निरामय व आशावादी असल्याने या दृष्टिकोणाचे विश्लेषण आणि प्रसार करणारे विचार त्यांनी लेखनात मांडलेले आहेत. पहिल्याच संपादकीयात 'संकटाचे स्वागत करावे' असे आवाहन ते करतात. 'संकटांना घाबरू नये, कारण संकटे फक्त भित्र्या माणसांनाच घाबरवतात; स्वतःचा उत्कर्ष साधण्यासाठी संकटांचे संधी म्हणून स्वागत केले पाहिजे. संकटाची भीती बाळगली तर मानसिक ताण वाढतो आणि व्याधींना आमंत्रण मिळते. संकटांमुळे सत्य समजते; संकटांत खऱ्या अर्थाने आपल्या मित्रांची आणि सग्यासोयऱ्यांची परीक्षा होते. याचवेळी परमेश्वरही आपली परीक्षा घेतो. याचमुळे संकटे माणसाला उपकृत आणि सबळ करीत असतात. जगात सुखापेक्षा दुःख अधिक आहे असे समजले जाते. तरी आपण त्यातूनही सुखाचा शोध करीत राहतो. ते सापडते असे नाही. कारण आपण चुकीच्या दिशेने सुखाचा शोध घेत असतो. खरे तर सुख आपल्या अंतरंगातच असते. आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी होणार नाहीत हे जर आपण मन:पूर्वक पत्करले तर अर्धे सुख आपण मिळवतोच. नंतरचा मार्ग स्वत:भोवतीचे वातावरण आशावादी आणि प्रसन्न ठेवून चोखाळता येतो. काळजी न करण्याचाही ते सल्ला देतात. 'उद्या'च्या काळजीत आपण आजचा आनंद गमावीत असतो. आजच्या दिवसाचे काम करीत राहा. काळजी करण्याचा कामावर प्रतिकूल ४ । जगण्यात अर्थ आहे..