पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्या गोष्टीबद्दल, घटनेबद्दल शंका निर्माण झाली आहे त्याबद्दल जोडीदाराबरोबर मोकळेपणाने चर्चा करा. गैरसमज दूर करा. या गोष्टी लगेच करा. कारण मनात शंका-संशय घेऊन वावरणारी व्यक्ती दुबळी होते. निराशावादी होते. उत्साह विसरते आणि इतरांना दु:ख देते. बऱ्याचदा अशी व्यक्ती मादक पदार्थांच्या किंवा इतर व्यसनांच्या आहारी जाते. अशा व्यसनांमुळे संशय बळावतच जातो. म्हणून संशय मनात रुजूच देऊ नये. संशयाचा निचरा न करता तो मनात ठेवला तर संशयाचे पिशाच्च बनते आणि डोक्यात शिरलेले हे पिशाच्च सर्व शरीर व्यापून राहते. सर्व शरीरावर अनिष्ट परिणाम करते आणि त्यातूनच शरीर कमजोर बनते. वैद्यकीय परिभाषेत अशा विकारांना 'मनोकायिक विकार' म्हणतात. संशय ही एक विकृती आहे आणि विकृती ही नेहमी मारकच असते. कर्तव्याची जाणीव न ठेवता हक्कासाठी भांडण आणि त्यातून संघर्ष निर्माण होतो. म्हणूनच दांपत्याने संस्कृतीचा विसर पडू न देता हक्क आणि कर्तव्ये यांची सांगड घालावी. संघर्ष नको असेल तर संशय टाळावा आणि संवाद साधावा म्हणजे संसार नक्कीच सुखाचा होईल. ४६ । जगण्यात अर्थ आहे..