पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

किंवा गोडवा दीर्घकाल टिकतो. हास्य हे इतके सोपे, स्वस्त असले तरी ते विकत घेता येत नाही. चोरता येत नाही. उसने घेता येत नाही किंवा त्यासाठी याचना करूनही ते मिळत नाही. हसतमुख चेहऱ्यासाठी मनाची तयारी असावी लागते. तयारी करावी लागते. मनाची तयारी नसताना, मन प्रसन्न नसताना मरगळल्यासारखे आणि जबरदस्तीने केलेले हास्य हे उपयोगाचे नसते. खरे हास्य हे मनातून, हृदयातून येते. हे हास्य शरीरभर असते. अशा हास्यामुळे सभोवतालचा परिसर भरून जातो. भारावून जातो. हास्यात रंगून- दंगून जातो. अशी व्यक्ती जिथे असते तिथले वातावरण आपोआपच प्रसन्न होते. मनापासून हसण्यामुळे ताण कमी होतो, दु:ख कमी होते. हास्यामुळे सौंदर्यात भर पडते. हसरा चेहरा नेहमी सुंदरच असतो. सुंदरच दिसतो. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, 'नेहमी प्रसन्न आणि हसतमुख राहा. हसतमुख राहणे हे एक प्रकारचे सेवाव्रत आहे. तुम्ही लोकांना स्मितहास्य द्या. लोक तुम्हाला प्रेम देतील. लोभ देतील. हसतमुख राहणे म्हणजे ईश्वराची भक्ती करणेच होय.' आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी. मनुष्य हा एकच प्राणी आहे की, जो हसू शकतो, बोलू शकतो, विचार करू शकतो, चिंतन करू शकतो. परमेश्वराने दिलेल्या या हास्यवरदानाचा आपण आपल्यासाठी आणि इतरांसाठी वापर करूया. हसूया आणि हसवूया...! हे साध्य करण्यासाठी, प्रकृती निरोगी ठेवण्यासाठी, मन प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्या भोवतालचे वातावरण टवटवीत ठेवण्यासाठी, दु:खाची तीव्रता कमी करण्यासाठी, संकटाशी दोन हात करण्यासाठी, कार्यक्षमता वाढविण्यासाठी, सर्वांना आनंद देण्यासाठी, दीर्घायुषी होण्यासाठी, इतरांना दीर्घायुषी करण्यासाठी 'चेहऱ्याला हसू द्या. , - चेहऱ्याला 'हसू' द्या... । ४१