पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आजार बळावतो, एका आजारामुळे शरीराच्या विविध भागांवर परिणाम होऊन अनेक अवयव निकामी होतात आणि रुग्ण जेव्हा गलितगात्र होतो तेव्हा सर्वांचे डोळे उघडतात. मग धावाधाव होते. अशा वेळी 'फक्त अॅलोपथी'चीच आठवण होते आणि अॅलोपथीमुळे फायदाही होतो. अॅलोपथी हे शास्त्रीय कसोटीवर सिद्ध झालेले शास्त्र आहे. त्यामुळे अॅलोपथीची शास्त्रशुद्ध औषधे वेळेवर घेतली तर निराश होण्याची वेळ येत नाही. औषधोपचारांबरोबर पथ्येही अत्यंत महत्त्वाची असतात. बऱ्याचदा काय होते की, नियमित उपचारांमुळे दुखण्याची तीव्रता कमी होते आणि रुग्णाची, आप्तस्वकीयांची पथ्यावरील पकड ढिली होते आणि हेच 'आजाराच्या पथ्यावर' पडते आणि आजार बळावतो. हे टाळायला हवे. दीर्घकालीन आजाराच्या बाबतीत सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाचे आरोग्य ! मन खंबीर असेल, मनोनिग्रह उत्तम असेल तरच अशा आजारांवर आपण मात करू शकतो. आजारावर विजय मिळवू शकतो. ज्यावेळी एखादा दीर्घकालीन आजार आपली साथ करणार आहे असे कळते त्याचवेळी त्या आजाराविषयी सखोल माहिती करून घ्यावी; मनातील शंका आपल्या डॉक्टरांना विचाराव्यात आणि त्या आजाराशी 'मैत्री' करून त्यावर मैत्रीपूर्ण मात करावी. जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट. आपल्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील कुणी अशा आजाराने ग्रस्त असेल तर त्यांच्या मानसिकतेचा विचार सहृदयतेने करा. त्यांना धीर द्या. आधार द्या. ते औषधोपचाराइतकेच किंवा त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. 'सकारात्मक दृष्टिकोन हा कोणत्याही आजारावर मात करणारा महत्त्वाचा औषधघटक आहे' असे म्हटल्यास ते चूक ठरू नये. बरेच रुग्ण याच्या उलट विचार करतात आणि सतत मृत्यूचा विचार करतात. असा विचार करणाऱ्यांचा आजार लवकर बळावतो आणि तो जादा त्रासदायकही होतो. मृत्यू ही सर्वांसाठीच अटळ बाब आहे. पण कुणी 'मृत्यू' येणार म्हणून जगायचं थांबत नाही. कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात, चला जगूया | १५१