पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नियमितपणे स्नान करणे, स्वच्छ कपडे परिधान करणे, सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वी न चुकता दात घासणे, जेवणापूर्वीच नव्हे तर तोंडात काहीही टाकण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुणे, नखे वेळेवर काढणे... या गोष्टी आपण शालेय जीवनातच शिकतो आणि त्यांचे पालनही करतो. पण याहीपलीकडे 'सार्वजनिक स्वच्छता नावाची गोष्ट अस्तित्वात असते याचा आपण विचारच करीत नाही. सार्वजनिक स्वच्छता म्हणजे माणसाच्या आरोग्यावर व वाढीवर परिणाम करणाऱ्या भौतिक पर्यावरणातील अनेक घटकांचे सुयोग्य नियंत्रण करून पर्यावरण स्वच्छ राखणे होय. आपण सर्वांनी जर मनावर घेतले आणि स्वच्छता व स्वच्छतेचे जे नियम आपल्या शरीराला लागू करतो, तेच नियम आपल्या परिसराला लागू करून घराचा, ऑफिसचा सर्वच परिसर स्वच्छ ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला तर किमान संसर्गजन्य आजार तरी औषधालाही सापडणार नाहीत. आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसेच घरासमोरचा परिसर आणि रस्ता जरी तो आपल्या मालकीचा नसला तरी स्वच्छतेपुरता आपल्या मालकीचा समजून, नियमितपणे प्रत्येकाने स्वच्छ ठेवला तर आपले स्वत:चे आरोग्य तर चांगले राहीलच, पण सर्व समाजाचे, देशाचेही आरोग्य सुस्थितीत राहील. १३६ । जगण्यात अर्थ आहे.. -