पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हर्षोत्फुल्ल बनविणाऱ्या कारंज्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी पाणीच लागते. हे पाणी आपण काटकसरीने वापरतो का? घरात असो की सार्वजनिक, वापरून झाला की नळ पूर्ण बंद करावा; विशेषत: सार्वजनिक ठिकाणचे नळ किंवा स्वच्छतागृहातले नळ बारा महिने, चोवीस तास चालू असतात. तिथले पाणी वाया जाणे म्हणजे प्रत्येक नागरिकाचा तोटाच नव्हे का? जसे पाण्याचे, तसे इंधनाचे! आज स्वयंचलित वाहनांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. एक वेळ अशी येईल की, लोकांकडे वाहने असतील पण ती सुखासमाधानाने चालविण्यासाठी रस्तेच नसतील. मुख्य प्रश्न आहे तो इंधनाचा ! गरज नसताना स्वयंचलित वाहनांचा वापर टाळावा. जवळच्या ठिकाणी जायचे असेल, बाजारात खरेदीला किंवा भाजीपाला घ्यायला जायचे तर चालत जावे. तीनचार जणांचा गट एके ठिकाणी जाणार असेल तर सर्वांनी आखणी करून एकाच गाडीने जावे. विशेषत: नोकरीसाठी दररोज स्वतःच्या वाहनाने जाणाऱ्यांनी असे गट करावेत. शहरातून प्रवास करताना बऱ्याचदा सिग्नलजवळ काही क्षण थांबावे लागते. हे क्षण १८० सेकंदांपर्यंत वाढू शकतात. टोलनाक्यावरही थांबण्याचा काळ बराच असतो. या एवढ्या वेळेत तीस ते चाळीस वाहने अडकून राहू शकतात. ही सर्व वाहने चालू असतील तर किती इंधन वाया जात असेल? अशा वेळी वाहन बंद करावे. या प्रकारची काटकसर सर्वांनी केली तर इंधनाची बचत होईलच पण वेगाने वाढणारे प्रदूषण काही अंशी थांबेल आणि सर्वांचेच आरोग्य चांगले राहील. आज अनेक शहरांत, महानगरांत सूर्योदय झाला तरी रस्त्यावरील खांब आणि त्यांच्यावरचे मर्क्युरीसारखे 'प्रखर दिवे' आपली ड्यूटी इमानेइतबारे करत असतात. काही काही वेळा भर दिवसा बारा वाजता हे 'लावलेले दिवे' अनेकांनी पाहिले असतील. कित्येकदा संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या खूप आधी हे दिवे लागतात. हे दिवे लावणाऱ्या आणि बंद करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांनी काटकसरीचा मंत्र अवलंबला तर हजारो वॅट विजेची बचत होऊ शकेल. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार गरजेच्या नेमक्या वेळी नगरांतील नि महानगरांतील दिवे १२४ । जगण्यात अर्थ आहे..