पान:चित्रा नि चारू.djvu/२७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 " जशी तिची इच्छा. " जहागीरदार म्हणाले.

 आणि ज्या मळ्यात चित्रा व चारू यांची प्रथम भेट झाली, दृष्टादृष्ट झाली, ज्या मळ्यात तिने झोके घेतले, त्याच मळ्यात सुंदर मंडप घालण्यात आला. मोठ्या थाटाने लग्न झाले, शेतकऱ्यांस मेजवानी देण्यात आली. निर्मळपूरचेही पुष्कळ प्रतिष्ठित लोक आले होते. फातमाचे प्रेमळ पत्र व लग्नभेट आली होती. चित्रा व चारू यांनी परस्परांस माळा घातल्या. सर्वांना आनंद झाला.

 लग्न झाले. सारी मंडळी परत आली. चित्रा सासरीच राहिली. एके दिवशी चित्रा व चारू त्या मळ्यात झोके घेत होती.

 "पडेन हो मी चारू. नको, मला भीती वाटते."

 "त्या दिवशी तू एकटी होतीस. आज आपण दोघे मिळून झोके घेऊ.मी तुला पडू देणार नाही."

 "त्या दिवशी रे मग का नाही बरोबर आलास ? "

 "तू का नाही बोलावलेस ? "

 असे प्रेमळ संवाद पतिपत्नीचे चालले होते. आणि त्या झोक्यावर दोघे चढली. चारूने खूप उंच चढविला झोका.

 " पुरे, मला भीती वाटते चारू. "

 " बरे पुरे ! "

 आणि थांबला झोका. दोघे खाली उतरली. मळ्यात फिरली.

 "हा मळा तुला फार आवडत होता ना?"

 "चारू, तुझा हा मळा म्हणून आवडे हो."

 " चित्रा, आपली का पूर्वजन्मीची ओळख होती ? पूर्व जन्मीही का आपण एकमेकांचा होतो ? आपणास परकेपणा अगदी वाटत नाही. खरे की नाही ?"

 " होय हो चारू, तुला जणू शोधीत मी या बाजूला आल्ये."

 " तू उद्या घरी जाणार ना ? "

 "चारू. आता तुझे घर ते माझे घर."

 "अग घरी म्हणजे माहेरी."

 "हो, उद्या बाबा नेणार आहेत. "

चित्रेचे लग्न * २९