पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गेली काय न माणसे निघुनियां ही चांगली चांगली ?
निद्रा काय सरस्वतीस तुमच्या होती तयीं लागली?
हा! हा! प्रश्न करूं नकाच मज हे! देऊ नका ती स्मृती!
झाली काय तयीं मलाच नकळे माझ्या मनाची स्थिती! १८

आले शंभरदा मनांत, धरिली हातांतही लेखणी,
होती साह्य सरस्वतीहि, नव्हतें गेहीं रुसाया कुणी,
'गोडी शोकरसी न' हा ध्वनि परी की जसा आदळे,
आपोआपचि ह्या करांतुनि तशी ही लेखणीही गळे ! १९

बोलावोनि परंतु मोरमकरें त्या रामकृष्णें मला
'वाचा' सांगुनि 'देशसेवक' जयी माझ्यापुढे ठेविला,
काळी रेघ चहूंकडे पसरतां त्या पत्रकी पाहुनी
नेला कोण नरावतंस ह्मटले काळें अहा बाहुनी ! २०

हा! हा! तो इतक्यांत खिन्नवदने मन्मित्र सांगे मला-
'गेला हो हरिपंत पंडित ! सखा गेला दिवीं आपला!'
वाणी कर्णकपाट फोडुनि शिरे ती अंतरंगी जयीं,
वाटे घोर विखार काय हृदया तोई पहाती तयीं ! २१

आली शोकरसास पूर्ण भरती, उद्विग्न झाली मती,
होत्या दावुनि ठेविल्या उसळत्या झाल्या पुन्हा त्या स्मृती,
गेला निश्रय भंगुनी, विसरही मौनव्रताचा पडे,
घेई धांव नको नकोहि ह्मणतां वाणी विलापाकडे ! २२

बोलूं काय? अहो, नसोनि बघतां कोणी सखा सोयरा,
वर्षे षोडश लाभ लोभ नसतां कांही कशाचा खरा
जेणे केवळ आपला ह्मणवुनी हा सिंचिला मोगरा,
गेला आटुनि काय तो सुरुचिर प्रेमामृताचा झरा? २३