पान:गांव-गाडा.pdf/145

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४      गांव-गाडा.

हिंदुस्थानावरील मुसलमानांच्या स्वाऱ्यांमुळे त्यांचा असा दरारा बसला आहे की, 'घरच्या भिणे घेतलें रान वाटेंत भेटला मुसलमान.' ही म्हण महाराष्ट्रांत बायकापोरांच्या तोंडात भिजत आहे. हे लोक लालबुंद, उंचे पुरे, भलेभक्कम आणि कजाग असतात; त्यामुळे ते जातात त्या गांवांत दिवसाढवळ्या जबरदस्तीने शिधा, चारा, लुटतात, व बिगारीच्या गाड्या काढतात. त्यांच्या टोळीबरोबर पोलीस असते. पण त्याची तारांबळ उडून आला पेंड कसा तरी पुढे वाटेला लावण्याविषयी कासाविशी चालते.

 चालूं वहिवाटीप्रमाणे भटकणाऱ्या लोकांना दर गांवीं तीन दिवस राहतां येतें. गांवच्या पाटलाची किंवा एखाद्या भरदार कुणब्याची अगर स्थानिक गोसाव्या फकिराची ओळख असते, अशा गांवीं ते तळ टाकतात, व तेथून आसपासची गांवें घेतात. मुक्कामाच्या गांवाला ते फारसा धक्का लावीत नाहीत, आणि गांव खूष राहील असा प्रयत्न करतात. त्याच गांवीं तेच भिकार फिरून फिरून उतरू लागले म्हणजे असे समजावे की गांवापासून तो नजीकचे पोलीसठाण्यापर्यंत त्यांनी वळण बांधिलं. भिकार उतरलें म्हणजे बिऱ्हांडे म्हाताऱ्याकोताऱ्यांच्या व जनावरें पोरासोरांच्या दिमतीला लावतात. जरूर तितक्या बायका सरपण व चारा गोळा करण्याला शेताशेतांनी हिंडतात, आणि उमेदचार पुरूष व बायका काळी-पांढरी मागण्याला निघतात. मुलें गायरानांनी किंवा राखण कमी अशा शेताच्या कडांनी किंवा बांधांनी जनावर लावतात, आणि आपण रमत बसतात, अगर शेताचा लांगालुंगा गोळा करण्याला जातात. त्यांच्या दुर्लक्ष्यामुळे गुरे शेतांत घुसतात. आणि कधी कधी तर ती स्वतःच त्यांना शेतांत घालतात, गुरेही ओढाळ व खायखाय करीत असावयाची, त्यांनी शेतांत धुसावयाचे, शेतकऱ्यानें हैक हैक करावयाचे, आणि त्यांनी तसाच चरण्याचा रट्टा लावावयाचा किंवा मुसंडी देऊन निघावयाचे, हा त्यांचा रोजचा परिपाठ. फिरस्त्यांची गुरे बहुधा हाती लागत नाहीत. यदाकदाचित् जर ती धरली