पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६४ । केसरीची त्रिमूर्ति

बाजू कोणती ? तर यज्ञोपवीत, गोब्राह्मण इत्यादि. स्वातंत्र्य, जन्मभूमि या शब्दांत वरच्यासारखा प्रभाव प्राच्य देशांत थोडाच आढळतो."
जातिभेद घातक
 हिंदुस्थानांतील अत्यंत बारीकसारीक गोष्टींचा सुद्धा तीव्र, उत्कट, जाज्ज्वल्य अभिमान धरणारे विष्णुशास्त्री ! अंतर्मुख दृष्टि करून स्वदेशाच्या विपन्नावस्थेचें कारण सांगतांना, १८५७ सालच्या तेजस्वी संग्रामाची चिकित्सा करतांना सुद्धा, अतिशय तटस्थपणें, पूर्वग्रहदूषित न होतां एक अतिशय विदारक सत्य सांगू शकतात ! या देशांत देशाभिमान ही वृत्तीच नाही ! पण एवढेच सांगून ते थांबत नाहीत; ही वृत्ति कां नाही हें सांगतांना जातिभेद हे एक मोठे कारण म्हणून त्यांनी सांगितलें आहे. त्याविषयी ते म्हणतात, "याने तर या राष्ट्राची फूट अतिशयितच पाडली आहे. अठरापगड जातींस अठरा टोपकरांनी गुंडाळून टाकले व साऱ्यांच्या हातीं सारखीच करवंटी दिली; पण लोकांचे डोळे अजून उघडत नाहीत." येथले ब्राह्मण, तुम्ही त्रिकर्मी नि आम्ही षट्कर्मी हृींच भांडणें भांडत बसले होते. त्याविषयी शास्त्रीबुवा म्हणतात, "यांना एकाहि कर्माची खरी ओळख नाही. मात्र या वादांत बिचारें ब्राह्मण्य तर टेम्स आणि रेणा यांच्या तीरांच्या आश्रयाने जाऊन राहिलें, या गोष्टीची दोघांहि पक्षकारांस शुद्ध नाही."
 देशाभिमान ही वृत्तीच येथे नाही. मग ती आणण्यास शास्त्रीबुवांच्या मतें, उपाय काय ? हा देश पादाक्रान्त करणाऱ्या पाश्चात्त्यांपासून ही गुरुकिल्ली आपण घेतली पाहिजे. त्यांचे इतिहास वाचून, त्यांच्या उलाढालींकडे सतत लक्ष पुरवून, आम्ही किती गचाळ लोक झालों आहों याची प्रचीती आपल्या ठिकाणीं बाणली पाहिजे. (आमच्या देशाला कांही झालें नाही- हा भ्रम सोडून दिला पाहिजे !) ती बाणली असतां लोह-परिस न्यायाने आमचे नादान लोकहि काले करून बाणेदार होतील !
अठरा धातूंची मूस
 या लेखांत विष्णुशास्त्री यांनी पुनः पुन्हा जातिभेदावर टीका केली आहे. लेखाचा समारोप करतांना त्यांनी म्हटलें आहे, (पाश्चात्त्यांपासून आम्ही गुरुकिल्ली घेतली तर) "कालयोगेकरून या अठरा धातूंचीहि चांगली मूस बनून, सर्वांस साधारण जो देश त्याविषयी अभिमानवृत्ति सर्वांच्या हृदयांत स्फुरूं लागतील, व या देशांतील सगळ्या जाती देशबंधुत्वाच्या थोरल्या नात्यांत अंतर्मुख होऊन एकोप्यापासून सर्वांचें किती हित आहे हे दिवसेंदिवस अधिकाधिक उमजूं लागतील, अशी दृढ आशा आहे."
 राष्ट्रभावनेचा अभाव, जातिभेद, हीं हिंदी लोकांच्या ऱ्हासाची मोठीं कारणें झालीं. पण ऐतिहासिक चिकित्सा करून माणूस वास्तव दृष्टीने पाहू लागला की त्याला या ऱ्हासाचीं, अवनतीचीं अनेक लहानमोठीं कारणें आणि लक्षणे दिसूं