Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





प्रस्तावना

 १९५७ साली डिसेंबर महिन्यांत नागपूरला 'साहित्यांतून नवी सृष्टि' या विषयावर मीं तीन व्याख्यानें दिलीं होतीं. विष्णुशास्त्री चिपळूणकर, प्रिन्सिपॉल गोपाळ गणेश आगरकर व लो. बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या साहित्याच्या साह्याने भारतांत नवी सृष्टि कशी निर्माण केली हें त्या व्याख्यानांत मी विशद केलें होतें. त्या वेळी या तीन थोर पुरुषांचा 'त्रिमूर्ति' असाच मी उल्लेख केला होता.
 तेव्हापासून या त्रिमूर्तीच्या कार्याचें विवेचन व मूल्यमापन करणारा ग्रंथ लिहावा असें मनांत होतें. अनेक कारणांनी या मधल्या काळांत तें जमले नाही. 'इहवादी शासन' हा माझा ग्रंथ 'केसरी प्रकाशना'ने प्रसिद्ध केल्यानंतर हा विचार मनांत पुन्हा बळावला. निबंधमालेची जन्मशताब्दीहि पुढे दिसूं लागली, आणि नव्या स्वरूपांत उभविलेल्या टिळक- स्मारक मंदिराचे उद्घाटन होण्याचा योगहि याच वेळीं येत आहे हें दिसलें. म्हणून दीर्घकाळ मागे पडलेला हा ग्रंथ हातीं घ्यावा व तो पूर्ण करावा असें मी ठरविलें व केसरी प्रकाशनासाठी तो स्वीकारण्याची श्री. जयंतराव टिळक यांना विनंती केली. त्यांनी ती तत्काळ मान्य केली. मी लगेच लेखनास प्रारंभ केला, आणि आता वर्ष-सव्वा वर्षांत ग्रंथ पूर्ण होऊन प्रसिद्धहि होत आहे.
 या ग्रंथांत 'केसरी'च्या या तीन संस्थापकांच्या कार्याचें विवेचन व मूल्यमापन केलें आहे. तेंच त्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचें चरित्र द्यावें हें नाही. दर विभागांत प्रारंभीं अगदी त्रोटक पद्धतीने त्यांच्या चरित्राची रूपरेषा दिली आहे; पण कालाचा संदर्भ ध्यानांत यावा एवढाच त्यांत हेतु आहे. त्यांच्या चरित्राची माहिती द्यावी हा नाही, आणि त्याची जरुरीहि नाही. त्यांची चरित्रे अनेकांनी लिहिलेलीं आहेत. अजूनहि कोणी लिहीत आहेत; आणि महाराष्ट्रांत आबालवृद्धांना तीं आता पाठ झालेली आहेत. या तीन थोर पुरुषांनी हिंदी राष्ट्राची जडणघडण कशी केली तें नव्याने विशद करणें मात्र अवश्य होतें. आणि म्हणून तें उद्दिष्ट मनापुढे ठेवूनच हा ग्रंथ लिहिला आहे.