Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-५-

तेजोवलयाचा भेद


तेजोवलय
 स्वत्वजागृतीसाठी ज्याप्रमाणे भारताची प्राचीन परंपरा व संकृति यांचे उज्ज्वल रूप लोकांना दाखविणें आवश्यक होतें, त्याचप्रमाणे ब्रिटिशांचें राज्य, ब्रिटिश राज्यकर्ते, त्यांचा धर्म, त्यांची नीति, यांच्याभोवती जे एक दैवी तेजोवलय येथील जनतेच्या भाबडेपणामुळे, अज्ञानामुळे, पुराणकल्पनांमुळे निर्माण झालें होतें तें फाडून काढून त्यांचें वास्तव रूप लोकांना दाखविणें हेंहि आवश्यक होतें. स्पॅनिश वीर कोर्टीझ याने सोळाव्या शतकांत मेक्सिको देश जिंकला तेव्हा तेथील मेक्सिकन भोळेभाबडे व अज्ञानग्रस्त होते. त्यांनी घोडा हा प्राणी पूर्वी पाहिलाच नव्हता. त्यामुळे घोड्यावर बसलेला माणूस हा पुराणांत वर्णिलेला कोणी दैवी पुरुषच आहे, असें त्यांना वाटलें. कोर्टीझनेहि तशा वदंता मुद्दाम पसरून देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे ते नरमांसभक्षक क्रूर अझटेक जमातीचे लोक एकदम लुळे पडले. त्यांचा प्रतिकार संपला; आणि स्पॅनिश लोकांच्या पायाशी ते शरण आले. हिंदुस्थानांतील लोकांनी इतक्या हीन पातळीवरची शरणागति पतकरली नाही हें खरें; पण इंग्रजांना परमेश्वराने धाडलें आहे, आमच्या उद्धारासाठी धाडलें आहे, असें येथले बुद्धिमंतांचे, पंडितांचे अग्रणीहि म्हणूं लागले होते. १८५७ च्या बंडाच्या वेळी 'संवाद- भास्कर' या कलकत्त्याच्या पत्राने, "ब्रिटिश राज्य हे रामराज्य आहे, रामाला सेतु बांधण्यासाठी खारींनी सुद्धा मदत केली होती, तशी आपण ब्रिटिशांना केली पाहिजे," असा उपदेश लोकांना केला होता. इंग्रज म्हणजे रामाच्या काळचीं वानरें असून, कलियुगांत तुमचें राज्य होईल, असा सीतेने त्यांना वर दिला होता, अशी पुराण कथा आम्ही आमच्या लहानपणी ऐकलेली आहे. तेव्हा इंग्रजी राज्यकर्त्यांच्या मुखाभोवतीचें हें दैवी प्रभामंडल वितळवून टाकणें फारच अवश्य होते. कारण त्याच्या
 के. त्रि. ३