Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७२ । केसरीची त्रिमूर्ति

ही रुढि कायद्याने बंद केलीच पाहिजे, असा आग्रह धरला आहे. शिवाय त्यांनी असेंहि सांगितलें आहे की, केवळ त्या कायद्याने सर्व कार्य होईल असें नाही. कारण कायदा मुलींच्या बाबतींत फार तर दहा-बारा वर्षांपर्यंत मजल मारील; पण एवढ्याने समाधान मानून चालणार नाही. आपणांस त्याच्यापुढे पुष्कळ गेलें पाहिजे; आणि तो पुढचा सर्व मार्ग क्रमण्यास समाजाच्या पायांतच जोर पाहिजे.
 या दुष्टं घातक रूढींमुळेच बालवैधव्य व केशवपन या अत्यंत क्रूर व राक्षसी आपत्ति स्त्रियांवर कशा येतात त्याचें सविस्तर वर्णन याच लेखांत आगरकरांनी केलें आहे व त्याहि रूढि कायद्याने नष्ट केल्या पाहिजेत, असे प्रतिपादिले आहे. या अमानुष रूढींमुळे आगरकरांच्या चित्ताचा केवढा दाह होत असेल हें ज्यांना पाहवयांचे असेल त्यांनी हा लेख पुनः पुन्हा वाचावा.
 बालविवाह व त्यापासून होणारे अनर्थ यांपासून स्त्रीचें रक्षण करण्यास आपल्या समाजांत स्वयंवर-पद्धति रूढ केली पाहिजे असें आगरकरांचें मत होतें. स्त्री-जीवनांत ही सुधारणा झाली तर स्त्रीच्या व्यक्तित्वाचा विकास होऊन ती सध्यापेक्षा पुष्कळच जास्त सुखी होईल, असें प्रतिपादन त्यांनी 'प्रियाराधन', 'स्वयंवर'. 'वल्लभोपासना' या लेखांतून केलें आहे.
 (३) स्वयंवर - स्वयंवरपद्धतीचें समर्थन करतांना प्रथम त्यांनी, युरोपीय ग्रंथकारांच्या आधारे, स्वयंवराची पद्धत प्राणिवर्गांतच दृष्टीस पडते असें नसून, वनस्पतींतहि दृष्टीस पडते, हा विचार मांडला आहे. स्वयंवर-पद्धति निसर्गसिद्ध आहे, म्हणून ती आपण अंगीकारिली पाहिजे, असें यावरून त्यांना सांगावयाचें आहे. निसर्गाने घालून दिलेल्या या आदर्शाचा आम्हीं अनादर केल्यामुळे या देशांत स्त्री-पुरुषांच्या रतिसुखाचा अगदी भंडवडा झाला आहे, असें सांगून पाश्चात्त्य व पौवा स्त्री- पुरुषांच्या प्रणयरंगांची त्यांनी तुलना केली आहे. "ज्यांच्या अवयवांची पूर्ण वाढ झाली आहे, ज्यांच्या विषयवासना जागृत झाल्या आहेत, उत्कंठा, अधीरता, लज्जा यांनी ज्यांचीं मनें व्यापून राहिली आहेत, अशा स्त्री-पुरुषांच्या प्राथमिक रति-सुखाची बहार कोणीकडे, व पंतोजीचा मार खाणाऱ्या, अभ्यासाखाली अर्धमेल्या झालेल्या, दुर्बल, भेकड, अशा आमच्या सोळा-सतरा वर्षांच्या पोरांच्या व ज्यांचा भातुकलीचा आणि बाव्हला बाव्हलीचा खेळ नुकताच कोठे सुटला आहे अशा आमच्या बारा-तेरा वर्षांच्या निस्तेज, लाजाळू व अज्ञान पोरींच्या बळजोरीच्या महालाची बहार कोणीकडे!"
 ही तुलना इतकी बोलकी आहे की, स्वयंवर-पद्धतीचें मंडन करण्यासाठी आणखी कोणताच मुद्दा मांडण्याची गरज नाही; पण त्या वेळचा समाज इतका मंद, बधिर व जीर्ण झाला होता की, ही तुलना समजण्याचीहि त्याला पात्रता नव्हती. म्हणुन आगरकरांनी आणखी बरेंच विवेचन केलें आहे. त्यांतील मुख्य विचार हा की, आमच्या देशांत प्राचीन काळी स्वयंवर-पद्धति रूढ होती, तेव्हा ती