Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५८ । केसरीची त्रिमूर्ति

तीच कुंटुंब-पद्धति त्यांच्यांत चालू राहते. त्यानंतर समाज व्यापार व उद्योगधंदे करू लागतो. या अवस्थांतराबरोबरच समाजाची सुधारणा होत असते. त्यामुळे कुटुंब- व्यवस्थेंतहि बदल होत जातो; आणि सर्व व्यवहार संमति-तत्त्वावर होऊं लागतात.
 आपल्या काळी हिंदु समाजांत रूढ असलेल्या धर्मकल्पना, सामाजिक रूढि व आचार यांचें मूळ कशांत आहे व त्या कल्पनांना व आचारांना कवटाळून बसणें किती असमंजसपणाचें आहे तें लोकांच्या निदर्शनास आणण्यासाठी आगरकरांनी धर्म, राजकारण व रूढ सामाजिक आचार यांची ही ऐतिहासिक चिकित्सा केली आहे. आपले सर्व आचार परमेश्वरप्रणीत आहेत व भावी उत्कर्ष त्यामुळेच होणार आहे हा भ्रम नाहीसा व्हावा व लोक, सुधारणेला, पाश्चात्त्य सुधारणेच्या तत्त्वांच्या स्वीकाराला, उद्युक्त व्हावे हा त्यामागील हेतु होता. हीं तत्त्वें विशिष्ट काळापुरतींच नसून, मनुष्यसुधारणेची सर्व इतिहासांत दिसून येणारी तत्वें तीं हींच आहेत, हा सिद्धान्तहि त्यांनी या उद्देशानेच मांडला. यायोगे आपली धर्मव्यवस्था, समाजरचना, कुटुंबसंस्था व विवाह संस्था यांतील बलात्कार-तत्त्व नष्ट होऊन सर्वन संमति-तत्त्व स्वीकारले जाईल अशी त्यांना आशा होती.