Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३६ । केसरीची त्रिमूर्ति

 बालविवाहामुळे मुलींना प्राथमिक शिक्षणहि मिळू शकत नाही. आणि त्यांची वाढहि नीट होत नाही. त्यामुळे त्यांचें व सर्व राष्ट्राचें अतोनात नुकसान होतें. स्त्रियांची ही गुलामगिरी नष्ट होऊन गृहस्थिति सुधारल्यावांचून राष्ट्राची सुधारणा होणें शक्य नाही, असें आगरकरांनी प्रतिपादिले आहे.
विषम समाजरचना
 समाजाच्या शिलावस्थेचें चौथें लक्षण म्हणजे विषमता हें होय. प्रत्येक देशांत विचार करणारे, उपभोग घेणारे व कष्ट करणारे असे तीन ठळक वर्ग आढळतात. तिसऱ्या वर्गातील लोक काबाडकष्ट करून आवश्यकतेचे व चैनीचे पदार्थ उत्पन्न करतात आणि वरच्या दोन वर्गांतले लोक त्यांचा उपभोग घेतात. जेव्हा ही विषमता वाढू लागते तेव्हा देशाचा ऱ्हास होऊं लागतो. आगरकरांना अशी स्थिति या देशांत उत्पन्न झालेली दिसली आणि त्यांनी तरुण सुशिक्षितांना, ती बदलण्याचा यथाशक्ति प्रयत्न करावा, असा उपदेश केला.
 विषम समाजरचनेचा दुसरा प्रकार म्हणजे जातिभेद व अस्पृश्यता. भारतांत एका वर्णाचे चार वर्णं झाले; आणि त्या चार वर्णांपासून हजारो जाति उत्पन्न झाल्या. समाजाच्या या विघटनेमुळे किती हानि झाली आहे तें आगरकरांनी एका लेखांत सांगितलें आहे. या जातींतील उच्चनीचतेमुळे देशाभिमान संकुचित झाला, धार्मिक आचारविचारांत मतभेद उत्पन्न होऊन परस्पर वैर, मत्सर व झगडे सुरू झाले. अन्नोदक व्यवहार व विवाह यांत नाना प्रकारच्या अडचणी उत्पन्न झाल्या; भूतदया, उदारता, धर्मबुद्धि यांचे क्षेत्र मर्यादित झालें.
 हिंदु समाजांत अतिशूद्रादि लोकांना अपवित्र व अस्पृश्य मानण्याची जी वृत्ति अजूनहि दिसून येते, ती मनुष्याच्या विचारीपणास अत्यंत लांछनास्पद आहे, असें आगरकरांनी स्पष्ट बजावलें आहे. महार, मांग, धेड वगैरे जातींचे लोक कधीहि गोवध करीत नाहीत व गोमांस खात नाहीत. मुसलमान व युरोपियन लोक मात्र तसे करतात. तरीहि त्यांचा स्पर्श सवर्णांना चालतो आणि महराची सावलीहि चालत नाही. अशा प्रकारे आपल्या धर्मांतील कांही माणसांना हीन, अपवित्र व अस्पृश्य मानून त्यांना दूर लोटल्यामुळे ते ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रचाराला चटकन बळी पडतात व ख्रिस्ती होतात, ही गोष्ट आगरकरांना अत्यंत उद्वेगजनक वाटत होती. उच्च वर्णाचे लोक शूद्रातिशूद्र लोकांना नीच न मानतां त्यांच्याशीं अन्नोदकव्यवहार करूं लागतील व त्यांच्या धर्मांतराला आळा घालतील तो सुदिन, असें त्यांनी म्हटलें आहे.
 'सोवळ्या ओवळ्याची पुरवणी' या लेखांत या जातीय विषमतेविषयी लिहितांना आगरकर म्हणतात, "समाजाच्या विलक्षण रहाटीमुळे उच्च-नीचत्व अस्तित्वांत येऊन तदनुसार जो व्यवसाय विभाग सहजगत्या झाला आहे, त्यास ईश्वरकृत मानून उच्च वर्गांत जन्मास आलेल्या लोकांनी नीचवर्गांत जन्मास आलेल्या