Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३४ । केसरीची त्रिमूर्ति

आम्हां साऱ्या अज्ञ लोकांस त्वां भारून टाकून केवळ गुलाम केलें असल्यामुळे आज कित्येक युगे अगदी अशक्य गोष्टी आम्ही शक्य मानीत आहों, व अत्यंत निद्य कृत्यें वंद्य मानून तुझ्या संतोषाकरिता ती बेलाशक करीत आहों; पण ध्यांनांत ठेव! या तुझ्या अश्लाघ्य व निर्घृण वर्चस्वाचा अंत होण्याचा काल अगदी समीप येऊन ठेपला आहे. आजपर्यंत त्वां आम्हांस ज्या असह्य यातना भोगण्यास लावलें आहेस, व जीं अनन्वित कर्मे आम्हांकडून करविली आहेस, त्या सर्वांबद्दल तुझीं पाळेंमुळें खणून काढून विचारकुंडांत पेटवलेल्या प्रचंड अग्नीच्या कल्लोळांत तुझी आहुति देणाऱ्या नवीन ऋषिवर्याचा अवतार नुकताच झाला आहे.
स्त्री-जीवन
 हिंदु समाजांतील स्त्रीची हीन दीन अवस्था हें त्या समाजाच्या शिलावस्थेचें तिसरें लक्षण होय. स्त्रियांच्या बाबतींत हिंदु धर्मशास्त्र फार निष्ठुर आहे. तें स्त्री- पुरुषांना समान अधिकार देत नाही, वेगवेगळा न्याय लावतें; तें पुरुषांचें पक्षपाती आहे. स्त्रियांवर त्याने फार अन्याय केलेला आहे. पडद्याची चाल, बालविवाह, विधवा-विवाहाची बंदी, शिक्षणाला बंदी या सर्व स्त्रीच्या दास्यत्वाच्या खुणा आहेत. स्त्रीला समाजांत प्रतिष्ठाच नव्हती, ती पुरुषाची दासी मानली जात होती. तिला घराबाहेर मानाचें स्थानच नव्हतें. पुरुषाच्या जीवनाचा अल्पांश, प्रजोत्पत्तीचें साधन, कष्टाची धनीण एवढीच तिची किंमत होती. तिच्या स्वतःच्या गुणांचें कांहीच महत्त्व नव्हतें. पतीच्या मृत्यूमुळे स्त्रीचें प्राणोत्क्रमण झालें किंवा ती सती गेली तर ती साध्वी असें मानले जात होतें.
 विधवा स्त्रीची अवस्था तर त्याहून शतपटींनी दयनीय होती. पति मेला की तिचा संसार संपला, तिला जगण्याचें कारणच राहिलें नाही; तिने पतीच्या प्रेताबरोबर सती जावें हाच सर्वोत्तम मार्ग मानला जात होता. कारण पतीच्या मागे तिने जिवंत राहणें हें त्या कुटुंबावर संकटच होतें. तिचें पाऊल वाकडें पडण्याची भीति सदैव असायची. त्यासाठी तिला सोवळी करण्याची चाल पडली. पतीचा आधार नसल्यामुळे घरांतल्या कोणीहि तिला छळावें अशी मुभा होती. तिच्याकडून किती काबाडकष्ट करून घ्यावें याला तर सीमाच नसे. गोळाभर अन्नासाठी बटकीप्रमाणे सर्वांची सेवा करावी, अपमान सोसावे, मुलांचे हाल झालेले मुकाट्याने पाहवें हेंच तिच्या नशिबी येत असे. 'शहाण्यांचा मूर्खपणा' या लेखांत आगरकर म्हणतात- "ब्राह्मणी विधवा ही हिंदु लोकांच्या निष्करुणेची, मात्सर्याची, अविचाराची, विपरीत व रानटी धर्मश्रद्धेची आणि अन्यायीपणाची खूण आहे!"
 विधवेचें केशवपन म्हणजे हिंदु स्त्रीवर होणाऱ्या घोर अन्यायाचें व जुलमाचें मूर्तरूपच होय. विधवेला पुन्हा विवाह करायला बंदी करूनच समाज थांबला नाही, तर तिला विद्रूप करून माणसांतून उठवण्याची व्यवस्था त्याने करून ठेवली. आणि ही तिची विटंबना कशासाठी, तर तिच्या व समाजाच्या नीतीच्या रक्षणा-