Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८६ । केसरीची त्रिमूर्ति

व्यवधान कधी सुटलेलें नव्हतें. या प्रेरणांचे ताणेबाणे या पटांतहि सारखे विणलेले दिसतातच.
 'संस्कृत कविपंचक' लिहिण्याचा उद्देश सांगतांना ते म्हणतात, "राष्ट्राच्या संबंधाने याचा उपयोग हा की, सध्या आम्हांस आमच्याविषयीचें जें लज्जास्पद अज्ञान आहे तें नाहीसें होऊन आपली योग्यता वास्तविक किती आहे हें चांगलें कळून येईल... इंग्रेज लोकांची विद्या व वैभव पाहून आम्ही पूर्वी केवळ चकित होऊन जात होतों व त्यांची योग्यता आम्हांस कधीहि यावयाची नाही असें म्हणत होतों. आमचे समज आता फिरले आहेत... बुद्धीच्या मानाने पाहतां आम्ही इंग्रेजांहून मुळीच कमी नसून ज्या कामांत आम्ही मन घालूं त्यांत त्यांची बरोबरी करूंच करूं."
 भवभूतीच्या विवेचनाचा समारोप करतांना, या उद्योगाचा हेतु त्यांनी पुन्हा स्पष्ट केला आहे. तो हा की, "नेणत्या मुलास त्याच्या बापाचें भुईंत पुरलेलें अपार द्रव्य पुनः दृष्टिगोचर करावें;" " सध्याच्या निकृष्ट स्थितीस्तव बाकीच्या सर्व जगास सर्वथा तिरस्कारास्पद झालों असतांहि आपणांस ज्या एकाकडे पाहून सर्व अद्याप मान देताहेत- तें हें विद्यारूप महाभांडार आहे."
 हें भांडार किती संपन्न आहें हे हिंदी जनांना चांगलें उमगावें म्हणून पाश्चात्त्य पंडितांनी त्याचा जो गौरव केला आहे, त्यांतून अनेक अवतरणें विष्णुशास्त्री यांनी दिली आहेत. सर विल्यम जोन्स म्हणतो, "भारतीय साहित्याकडे कोठेहि दृष्टि टाका. अनंताची कल्पना समोर उभी राहते. इतर देशांच्या साहित्याच्या राशींमध्ये हें साहित्य हिमालयासारखें उत्तुंग दिसतें. त्याचें अध्ययन कोणालाहि एका जन्मांत पुरें क़रतां येणार नाही." "पृथ्वी आणि स्वर्ग यांचा मधुर संगम तुम्हांला पाहवयाचा आहे काय? मग शाकुंतल पाहा." असे जर्मन महाकवि गटे याचे उद्गार आहेत. "शाकुंतलाचा जगविख्यात कर्ता कालिदास हा, निसर्गाचा मानवी मनावर केवढा प्रभाव असतो त्याचें उत्कृष्ट वर्णन करतो. भावनांचा मधुर-कोमल आविष्कार आणि संपन्न कल्पनाशक्ति यांमुळे जगाच्या कवि-मालिकेत त्याला श्रेष्ठ स्थान मिळालें आहे." असा गौरव अलेक्झँडर हंबोल्ट याने केला आहे. मोनियर विल्यम्स याने 'हा भारताचा शेक्सपियर आहे,' असे धन्योद्गार काढले आहेत.
 भारतीयांचें हें सुप्त धन, विस्मृतीत गेलेलें धन, हें पैतृक धन त्यांना पुन्हा युरोपीय पंडितांनी दाखविलें; म्हणून त्यांचे आम्हांवर अनंत उपकार आहेत, असा ऋणनिर्देश विष्णुशास्त्री ठायीं ठायीं करतात तो राष्ट्रावरील भक्तीमुळेच होय.
कृतज्ञता
 आपण या पाश्चात्त्यांच्या उपकाराच्या कल्पनेने विष्णुशास्त्री इतके भारून जातात की, प्रसंगवशात् कांही कारणाने त्यांच्यावर टीका करण्याची वेळ आली तर, कृतघ्नता तर दाखवीत नाही ना, अशी त्यास शंका येते. ते म्हणतात, "त्यांवर टीका करण्याचा हक्क चालवावयास आम्ही मुखत्यार आहों हें खरें पण तो हक्क कडक