Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टीकाकार विष्णुशास्त्री । ८३

सहज वाटणार आहे." असें होण्याचें कारणहि शास्त्रीबुवांनी दिलें आहे. ते म्हणतात, "मोरोपंताचा जर संस्कृत पंचकाव्यावर व नाटकांदिकांवर सतत परिश्रम असता तर त्यांतील सर्व विशेष त्याच्या कवितेंत दृष्टीस पडल्यावांचून राहतेना."
 या सगळ्याचा भावार्थ असा की, संस्कृत वा इंग्रजी अभिजात साहित्यांत जे सौंदर्यगुण दृष्टीस पडतात ते मोरोपंताच्या कवितेंत आढळत नाहीत.
 'विद्वत्त्व व कवित्व' या निबंधांत जुन्या शास्त्री पंडितांना काव्याभिरुचिं नव्हती हें दाखवितांना मोरोपंताविषयी हाच अभिप्राय, विष्णुशास्त्री यांनी दिला आहे. ते म्हणतात, "या शास्त्री पंडितांच्या मतें, मोरोपंतासारखा कवि आजपर्यंत झाला नाही व पुढे होणार नाही; पण त्यांस एवढे समजत नाही की, यमक- प्रासांची गर्दी ही बुद्धीची दर्शक होय, पण ही बुद्धि व कवित्व एक नव्हेत."
 'कविता' या निबंधांत तर वामनपंडित, मोरोपंत यांच्याविषयी विष्णुशास्त्री यांनी फारच स्पष्टपणे लिहिले आहे. त्यांच्या मतें शाहिरांच्या लावण्या किंवा पोवाडे हीच मराठी भाषेची आद्य कविता. कारण, वामनपंडित, मोरोपंत वगैरे कवींनी मराठी भाषेंत आपली कविता लिहिली, तरी ती संस्कृत भाषेच्याच केवळ धाटणीवर असल्यामुळे तीस मराठी कविता म्हणण्यापेक्षा संस्कृत कवितेचें रूपांतर म्हणावें हें वाजवी होय.
तत्त्वचर्चा
 साहित्य- समीक्षा हे एक शास्त्र आहे. साहित्याविषयी कांही सिद्धान्त सांगून त्यांचें विवरण करणें हा त्याचा एक भाग, आणि त्या सिद्धान्ताअन्वये काव्य- नाटकादि साहित्यकृतींचें परीक्षण करणें हा दुसरा भाग. विष्णुशास्त्री यांनी केलेल्या परीक्षणांचा विचार येथवर केला. पाश्चात्त्य समीक्षा-पद्धति मराठींत आणणें त्यांचे महत्त्वाचे कार्य होय, हें तेथे आपण पाहिले. आता साहित्याविषयी त्यांनी जे तात्त्विक सिद्धान्त सांगितले आहेत त्यांची चर्चा करावयाची आहे.
 खरें म्हणजे असे सिद्धान्त फारसे नाहीत. एक-दोनच आहेत. त्यांतहि महत्त्वाचा एकच आहे. 'कवित्वास अज्ञानावस्था विशेष अनुकूल असते.' 'कवितेचा ज्ञानसंपन्नतेच्या काळांत उत्तरोत्तर ऱ्हास होत जातो' हा तो सिद्धान्त होय. 'संस्कृत कवि-पंचक' या ग्रंथांत प्रथम बाणभट्टाच्या प्रस्तावनेत त्यांनी तो मांडला आणि पुढे निबंधमालेतील 'विद्वत्त्व आणि कवित्व' यांत त्याचा सविस्तर प्रपंच केला. या सिद्धान्ताची विशेष चर्चा करण्याचें कारण नाही. सध्या आता हा अगदी भ्रामक ठरला आहे. तो कोणीहि मानीत नाही. ज्या मेकॉलेच्या अनुकरणाने विष्णुशास्त्री यांनी हा सिद्धान्त मांडला त्याने सुद्धा उत्तरकाळांत तो रद्द ठरविला होता. तेव्हा त्याचें महत्त्व फारसें नाही. पण 'विष्णुशास्त्री यांची साहित्य-समीक्षा' आपण पाहत आहों तेव्हा विषयपूर्तीसाठी थोडी चर्चा करू.