पान:काशीयात्रा.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.

 मी जेव्हां यात्रेस निघालो त्या वेळी ती संबंधों हकीकत लि- हिण्याची कल्पना सुद्धां माझे मनांत नव्हती. परंतु प्रवासास आरंभ केल्यावर ज्या गोष्टी मला घडल्या व माझ्या पाहण्यां. त आल्या त्यांपैकी काहींची हकीकत लिहून वर्तमानपत्रांत छाप- विली असतां त्याचे वाचणारास क्षणभर कर्मणूक होईल. अशा समजुतीने मी एक दोन पत्रे ज्ञानप्रकाशास पाठविली व ती पत्रे त्या पत्राच्या कर्त्याने साद्यंत छापली व त्यांचे उतारेही दुसऱ्या वर्तमानपत्रांनी घेतलेले माझ्या पाहण्यांत आले. त्यावरून हीं पत्रे वाचणारांस कांहींशी रुचतात असा ग्रह होऊन मी तसाच क्रम पुढे चालविला. व हिंदुस्थानांत मथुरा, वृंदावन, गोकूळ, आग्रा, अमृतसर, लाहोर, मुलतान वगैरे जी नामांकित मोठ मोठी शहरे पाहण्यांत आली त्यांचे अल्प स्वरूप वर्णन करून ते ज्ञानप्रकाशास पाठवीत गेलो. पुढे पुण्यास आल्यावर कितीएक माझ्या मित्रांचे सांगणे पडले कीं, हीं पत्रे एकत्र करून त्यांचा ग्रंथ केल्यास तो बराच कर्मणुकीचा होईल. व वर सांगितलेल्या जुन्या शहरांची माहिती लोकांत प्रसृत होण्यास कारण होईल. ही कल्पना म लाही पसंत वाटून हा लहानसा ग्रंथ सुज्ञ वाचक जनास विनयपूर्वक सादर केला आहे तर त्यांतील गुणलेश ग्रहण करून दोषांकडे दुर्लक्ष करतील अशी आशा आहे.

पुणे ता० १ नोवेंबर सन १८७२,

ग्रंथकर्ता.