काम सांवतवाडीकडे लोक करतात त्याप्रमाणे संगमरवरी दगड कोरून मोठ मोठाले दरवाजे, खिडक्या, भिंती वगैरेची कामे केली आहेत. अशा मोठ मोठाल्या कबरी ह्या ठिकाणी दहा वीस आहेत. येथे कोट्यावधी रुपये खर्च झाला आहे.
दिल्ली शहरांत जम्मा महजीद म्हणून एक मोठी इमारत तांबडया कुरूंदाच्या दगडाची बांधलेली आहे. ह्या महजिदीस तीन अंगानी मुंबईतील टाऊनहालाला बांधलेल्या पायऱ्याप्रमाणे पायऱ्या आहेत. ह्याप्रमाणे येथे प्राचीन इमारती पाहण्यासारख्या आहेत. हल्ली सरकारानी शहरांत एक म्युजियम केले आहे. त्यांत वाघ, चित्ते वगैरे चमत्कारिक पशु पक्षि पाहण्यासारखे आहेत.
येथे अत्तरें व सुगंधी तेले स्वस्ती मिळून उंच्या प्रतीची मिळतात. ह्याप्रमागेच कलाबतूच्या कामाच्या टोप्या व जोडे फार चांगले मिळतात. येथे पांढरी पागोटी चंदेरी तऱ्हेची उंच्या प्रतीची लाखो रुपयांची होतात आणि ती दक्षिणेत आणि गुजरात विकण्यास जातात.
येथील हवा आपल्या तिकडील देशाप्रमाणेच आहे. आतां मला झोप येते म्हणून पुरे करतो हीच विनंती.
एडिटराचा मित्र
एक फिरस्ता.
मुक्काम० श्री क्षेत्र वाराणसी.
ज्ञानप्रकाशकर्ते महाराज:-
वि०वि०. गेल्या पत्री आपणास श्री क्षेत्र मथुरा व शहर दिल्ली येथील माहिती लिहून पाठविली ती आपण आपल्या सुंदर पत्री छापून प्रसिद्ध केली, हे पाहून मला पुढे आणखी वायव्येकडील