Jump to content

पान:कार्यसंस्कृती.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संस्कृती की विकृती त्या शाळेला ग्रँट नव्हती तेव्हापासून माईणकर तिथं काम करताहेत. अगदी पहिल्या रजिस्ट्रेशनपासून ते वीटवाल्याला विटा पाठवायला सांगेपर्यंत पगार मिळो अथवा न मिळो, शाळेसाठी स्वतःचा कणन कण झिजवला आहे. सुरुवातीला पाच शिक्षक, हेडक्लार्क पाटील, माईणकर पळापळी करण्यासाठी, चावरे शिपाई आणि मुख्याध्यापक एवढीच मंडळी होती. मग शाळा मोठी झाली. विद्यार्थ्यांची संख्या वाढली. इमारत मोठी झाली. सरकारी ग्रँट नियमितपणे सुरू झाली. शाळेत नवी माणसं आली. खुषमस्करे आले. राजकारण वाढलं. माणूस माणसाला ओळखेनासा झाला. सर्वांची चढाओढ वर जाण्यासाठी, माईणकरांचा श्वास आता तिथं कोंडू लागला. उठता बसता बंगल्यावर जाऊन वरिष्ठांना भेटणं, त्यांच्या दरबारात बसणं माईणकरांना जमेनासं झालं. ते मग मागे पडले. मागून आलेले पुढे गेले. शाळा काय किंवा कारखाना काय, तो चालवायला एक नेतृत्व लागतं. सर्वांना बरोबर घेऊन, काम करणाऱ्याला प्रोत्साहन देणारं, खरं ते खरं म्हणून ओळखणारं नेतृत्व. ते नसेल तर कामाच्या ठिकाणी संस्कृती नांदत नाही. राहते आणि वाढते ती विकृती. कार्यसंस्कृती ५२