Jump to content

पान:कार्यसंस्कृती.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मूडप्रमाणे काम शर्मिला विद्यापीठात संशोधन करत आहे. गेली दोन अडीच वर्षं तिच्या रोजच्या कामाच्या वेळा ठरलेल्या आहेत. त्या वेळा ऐकून मला फार विचित्र वाटलं. खरं तर ९ ते ५ अथवा ११ ते ६ काम करणाऱ्यांना त्याच वेळेत काम करण्याचं बंधन असतं. शर्मिलासारख्या संशोधिकेला आपल्या मनाप्रमाणे, मूडप्रमाणे कामाच्या वेळा ठरविण्याचं स्वातंत्र्य घेता येतं. तिच्या सवयीप्रमाणं रात्री १० नंतर सर्व झोपले की दोन तास तरी वाचन आणि मगच झोप असं तिनं ठरवलेलं आहे. सकाळी उठण्याची वेळ मात्र लवकरची. कारण तेव्हा पुन्हा तिचं काम छान होतं. या दरम्यान झोपेचा वेळ मात्र कमी होतो. पण चांगलं वाचन होण्यासाठी तिला झोप सोडावी लागते. कामातून मिळणारा समाधानाचा, आत्मविश्वासाचा आनंद ती दिवसाच्या सुरुवातीलाच घेत जाते. दुपारी विद्यापीठातील एक किंवा दोन तास प्रात्यक्षिकाचे झाले, की तिला तासभर तरी शांतपणे विश्रांती घेता येते. तिच्या कामात ती अगदी प्रवीण आहे. शर्मिलाचा संध्याकाळचा वेळ ग्रंथालयातून पुस्तकं पाहण्यात, थोडं लिखाण करण्यात जातो. त्यानंतर मित्रमैत्रिणी वगैरे भेटी उरकून आठ ते दहा तिला घरीही वेळ मिळतो. विद्यापीठातल्या कामात ती फार गढलेली आहे. तिच्या वेळा मात्र स्वतःच्या सवयीच्या, आवडीच्या आणि मूड बघून ठरवलेल्या आहेत. सुट्टी आणि विश्रांतीदेखील तिच्या गरजेप्रमाणे तिनंच ठरवली आहे. या वेळांची सहकाऱ्यांनीदेखील सवय लावून घेतली आहे. ९९८ कार्यसंस्कृती.