पान:कायदेभंगाच्या चळवळीत - विठ्ठल रामजी शिंदे.pdf/१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कायदेभंगाच्या चळवळीत

                                    विठठल रामजी शिंदे

१९३० साली एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात सोमवारी सकाळी मी हवेली तालुक्यातील पहिल्या दौऱ्यावर निघालो. बरोबर दहापंधरा तरुण स्वयंसेवकांची तुकडी होती. सत्याग्रहाचा मोठ झेडा फडकत होता. बाजाची पेटी, टाळ आणि प्रभातफेरीची पदयावली प्रत्येकाच्या हाती होती. एक डफ- तुणतुण्यासह पोवाडेवाल्यांचा ताफा बरोबर होता. पुण्याच्या हद्दीवर फर्ग्युसन कॉलेजच्या समोर प्रथम झेडावंदन झाले

                      दौरा

हा दौरा प्रथम पुण्याजवळील दापोडी गावी गेला. तेथन प्रत्येक खेडेगावात प्रथम प्रभातफेरी म्हणत उभ्याउभ्याच व्याख्याने देत पुढच्या गावी जात असू. दोन प्रहरी एखादया गावी जेवण्याचा बेत आधीच ठरलेला असे. स्नान वगैरे आटोपल्यावर जेवण्यास वेळ असेल तेव्हा पोवाडे सुरू होत. चिंचवड, देहू आळंदी, चऱ्होली, लोणी, लोहगाव वगैरे लहानमोठी सर्व गावे करून पहिल्या आठवड्यात बहुतेक हवेली तालुका संपवला. हया आठवड्यात पायी शंभर मैलांचा प्रवास झाला. हया दौऱ्याचा पुढील आठवडयाचा कार्यक्रम वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असे; पण एकदोन दिवसांतच खेडयापाडयातून दौऱ्याची दाट वदता कर्णोपकर्णी पसरू लागली. एक गाव संपवून पथक दुसऱ्या गावी निघाले की, झेंडयाची वाट पाहात बायकामुले हद्दीवर येऊन बसत. पुढे पुढे तर हा दौरा खेडयांतील लोकांना -इतका प्रिय झाला की, एका गावचे लोक आपल्या गावचे हद्दीपर्यंत पोचवायला येत तर दुसऱ्या गावचे लोक सामोरे न्यावयाला येत. दौरा अमुक ठिकाणी असेल असे संकेताने ओळखून पुण्याहून वासुकाका जोशी, देवगिरीकर वगैरे मंडळी मधून मधून समाचार घेण्यास येत.पहिल्या आठवडयाचा दौरा संपवून शेवटचे खेडे जे लोहगाव त्याहून येत असता वाटेत येरवडयाच्या तुरुंगाच्या बाहेर उभे राहून पथकाने एक गाणे म्हटले.तुरुंगाच्या बाहेर काही कैदी काम करीत होते, आम्हीही त्यांच्याबरोबर लवकर जाऊ असा विश्वास आम्हास वाटत होता. झेंडयाचा जयजयकार झाला त्या वेळी कैदयांनीही त्यात भाग घेतला. पोलिस कौतुकाने पाहात होते. येरवडयाजवळील

महापर्व/१४९