Jump to content

पान:कला आणि इतर निबंध.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकारची घाण आहे. एक पारतंत्र्याची घाण, व दुसरी अज्ञान व अस्वच्छता यांची घाण. ही दोन्ही प्रकारची घाण दूर करण्यासाठीं निवेदिता उभ्या राहिल्या.
 भारताला स्वातंत्र्यासाठीं उद्युक्त करावयाचें होतें. त्यासाठीं राष्ट्रीयत्वाच्या कल्पनांचा प्रसार करणें अवश्य होतें. तरुणांच्यासमोर राष्ट्रीयत्वाचे तेजस्वी विचार नेले पाहिजे होते. शाळांतून, कॉलेजांतून, वर्तमानपत्रांतून– सर्व साधनांच्या द्वारां नवराष्ट्रनिर्मितीस चालना दिली पाहिजे होती. श्री० रोमां रोलां या विश्वविख्यात फ्रेंच साहित्यिकानें विवेकानंदांचें जें चरित्र लिहिलें आहे, त्यांत ते म्हणतात, "विवेकानंद सर्व गोष्टींच्या आधी राष्ट्राचा उद्धार करणारे आहेत. He is first essentially a nation-builder." खऱ्या धर्माचें ज्ञान नसल्यामुळे राष्ट्रास विकलता आली असें विवेकानंद म्हणत. या राष्ट्राचा उद्धार करावयाचा म्हणजे सद्धर्माची कल्पना दिली पाहिजे. व्यावहारिक वेदान्त शिकविला पाहिजे. प्रयोगालयांतील वायु वेदांतील मातरिश्वाइतकाच पवित्र आहे हें पटविलें पाहिजे. भारताच्या विशाल संस्कृतीची, धर्मांतील उदात्त तत्त्वांची भारतीय जनतेस विस्मृति पडली होती, म्हणून वाईट दिवस आले. विवेकानंदांना हा भारत केव्हां मुक्त झालेला पाहीन असें होई. ते म्हणत, "मला एक हजार सेवक द्या; परंतु ते सिंहाच्या छातीचे द्या. मी भारताचें रूप बदलून टाकीन." विवेकानंद, ब्रह्मबांधव उपाध्याय व देशबंधु चित्तरंजनदास या तिघांच्या देशभक्तीस सीमा नाहीं, असें बंगालमध्ये मानतात. या देशांतील स्त्रियांची, हरिजनांची, रानटी लोकांची स्थिति डोळ्यांसमोर येऊन विवेकानंद रात्रीच्या रात्री रडत. असा हा महापुरुष होता. सर्व