Jump to content

पान:कला आणि इतर निबंध.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कलेचा संदेश
४३
 

कलाभिज्ञाकडे नेलें. त्याने माझ्या शंकेला पुढील शब्दांत उत्तर दिलें, "डी हूग् हा अपूर्व चित्रकार आहे. सूर्यप्रकाश कसा रंगवावा हें त्याच्याशिवाय कोणालाहि समजले नाही. त्याला सूर्यप्रकाश फार आवडायचा." कोडें उलगडलें; गूढ आत्म्यावरील पडदा उचलला गेला. माझें हृदय तीं चित्रे पाहून कां उन्नत होई, कां उचंबळून येई, तें मला कळलें. मीं पुन्हा तीं डी हूगची चित्रे पाहिली. त्यान रंगवलेल्या त्या लाल विटा- त्यांच्यावर सतत सूर्यप्रकाश पडलेला मला दिसला.
 नानाप्रकारचे विरोध-भाव यांनीही सौंदर्य निर्माण होतें. विरोधी भावदर्शनानें रस उत्पन्न होतो. ऐक्य असून, चित्रामध्ये एकता असूनहि त्यांत विरोध हवा. तो विरोध चित्राला पूर्ण करणारा हवा. त्याचप्रमाणे रंगाचा विचार. हिंदी विद्यार्थ्यांनी काढलेल्या पुष्कळशा चित्रांतून- ऑईलपेंट चित्रांतून, प्रकाशहीन, निस्तेज तळीं व त्यांच्या कांठच्या शाकारलेल्या झोपड्या आणि त्या सर्वांवर पसरलेली झाडांची छाया निळ्या हिरव्या रंगांत- हें सारे रंगलेलें होतें. निरुत्साही निस्तेज देखाव्याचीं हीं निस्तेज चित्रे जरी यथार्थ असलीं, आपणांस प्रिय असणाऱ्या पुष्कळशा जागा जरी अशाच दिसत असल्या, जरी हीं चित्रे बाह्यतः रचनादृष्ट्या, आकारष्ट्या सुंदर असली, तरी एखादा प्रकाशमय कुंचला, एखादा तेजोदायी ब्रश जर घरावर किंवा तळ्यावर किंवा पर्णांवर कोठें दाखवला गेला असता, तर त्या एका ब्रशाने, एका कलमाने आश्चर्य घडून आलें असतें. रानांत जाणाऱ्या ध्रुवबाळकाचेंही चित्र वरचेवर काढण्यांत येतें. या चित्रांत तर सारा गोंधळच दर्शवितात. एकहि प्रकाशकिरण तेथे दिसत नाही. निळसर, हिरवट भूमीवर कांहींतरी दाखवणें म्हणजे चित्र होत नाही. वनमार्गानें ध्रुव जेव्हां आपल्या ध्रुवध्येयाकडे जात होता, त्या वेळेस