Jump to content

पान:कला आणि इतर निबंध.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
कला आणि इतर निबंध
 

तात. सामाजिक दृष्टया आज भारतांत कलेमध्यें क्रांति होत आहे. तेराव्या शतकांत युरोपमध्ये अशीच चित्रकलेत क्रांति होत असतां त्या क्रांतिकाळांतील चित्रकाराग्रणी गिओटो याने जशी त्या काळांतील परमोच्च संस्कृति आपल्या अमर चित्रांत ओतली आहे; जें फ्लॉरेन्स शहर डान्टेच्या डिव्हाईन कॉमेडीनें तल्लीन व मुग्ध होऊन गेलें होतें, त्या फ्लॉरेन्सला गिओटोने दगडांत पाषाणांत खोदलेलें 'डिव्हाईन कॉमेडिया' काव्य अर्पण केलें त्याचप्रमाणे आज भारतांतील क्रांतिकाळांतील चित्रकारांनी जुनीं बंधनें व रूढि झुगारून, मुक्त होऊन, नवीन आपल्या काळांतील भावना, विचार, आपल्या काळांतील मन, हृदय हीं चितारायला उभे राहिलें पाहिजे. ही नवीन पूजा त्याने सुरू करावयाची आहे. अत्युच्च कला जणु कांही विजेनें भारलेली असते. अध्यात्मिक विद्युत् तिच्यांत स्फुरत असते. बौद्धिक व हार्दिक गोष्टीचें प्रकटीकरण करीत असते. नवभारताच्या चिताऱ्यांनीं नवभारताचे मन व बुद्धि चित्रांत दर्शविलीं पाहिजेत. यासाठीं अत्यंत गंभीर, खोल व उत्कृष्ट असें व्यापक शिक्षण त्यांना मिळालें पाहिजे. आपल्या काळांतील संस्कृतीच्या सिंधूत जो डुबलेला नाहीं, जो बुचकळून आलेला नाहीं, त्याला ती संस्कृति अमर अशा कलेच्या रूपानें कशी प्रकट करतां येणार? स्वकालीन संस्कृतींत मुरून गेली पाहिजे त्याची वृत्ति. काळाशी त्याने एकरूप झालें पाहिजे. राष्ट्राच्या ध्येयाशीं, भवितव्यतेशीं, झगड्यांशीं, आकांक्षाशीं त्याने एकरूप झालें पाहिजे. तरच त्याचें प्रतिबिंब कलावंताला कलेत उत्कृष्टपणे ओततां येईल. राष्ट्रीय झगड्यांत ज्याचें जीवन रंगलें नाहीं, तो राष्ट्राच्या हृदयांतील आशांचा अर्थ दुसऱ्यांस काय सांगणार?