Jump to content

पान:कला आणि इतर निबंध.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
कला आणि इतर निबंध
 

गुरू मानून आपण कांहीतरी बोलूं लागलों, वाहून जाऊं लागलों. सुधारणा करण्यासाठीं आवश्यक असणारें ज्ञान जगांत फार दुर्मिळ असतें, तें मिळवणें फार दुष्कर असतें; परंतु कोणत्या बाबतींत कसेकसे फरक घडवून आणावयाचे, या महत्त्वाच्या बाबतींत निश्चित दिशा ठरवण्यासाठीं ज्ञान, जबाबदारीची जाणीव व नीट मनन या गोष्टींची जरूर आहे. राष्ट्रीययतेची भावना हृदयांत वाढू लागतांच आपणांस जणुं मग दुसरे विचार डोळे येतात, नवीनच एखादें बुद्धींद्रिय फुटतें, आपणांस नवीन चित्स्फूर्ती येते. परस्परांतील संबंध व ऐक्य दिसून येऊ लागतें. वृक्षाच्या फांद्या, पानें, फुलें, फळें, मुळे, यांचा नीट संबंध समजून येऊं लागतो. ही दृष्टि आली म्हणजे मग आपणांला राष्ट्राच्या भवितव्यतेची चर्चा करण्याचा अधिकार मिळतो.
 आपणांस भारतीय कलांच्या बाबतींत तर इतर क्षेत्रांच्या आधीं गेलें पाहिजे. कला राष्ट्राचें जीवन बनवीत असतात. जें कलांचें ध्येय, तें राष्ट्राचें ध्येय होय. कलांमध्ये प्राण ओतला म्हणजे राष्ट्रामध्यें प्राण संचरेल. राष्ट्रांतील बुद्धिमान लोक एकत्र येऊन भारताच्य भूत व भविष्य कलेबद्दल विचारविनिमय करीत आहेत, अशी आपण कल्पना करूं या. या बुद्धिमान् लोकांनीं काय शोधावयाचें? त्यांनी कशाचा निर्णय करावयाचा?
 हिंदु धर्माचा एक विशेष हा आहे कीं, हिंदु धर्म म्हणजे प्रतीकशाळा आहे. प्रत्येक कल्पनेची, विचाराची प्रतीके आहेत. म्हणजेच हिंदुधर्म मूर्तिपूजक आहे. अडाणी शेतकरी, बाजरांत बसणारा हिंडणारा अत्यंत दरिद्री मनुष्य, यांनाही चित्र आवडतें, प्रिय वाटतें, त्यांना तें समजतें. एखादें सुंदर भांडे, एखादा पुतळा, एखादें नकशी काम पाहून त्यांना