“शिरीष, तू नाही ना मला असाच सोडून जाणार? राजाचे मंत्रिपद तुला मोह नाही ना पाडणार? तू गेलास तर मी अशीच ओरडत बसेन. तुझी करुणा रडत बसेल. नको हो जाऊ.”
“ नाही जाणार. तुम्हाला कोणालाही सोडून मी जाणार नाही.”
“ शिरीष, लवकरच आपल्या विवाहाचा वाढदिवस येईल.”
“ यंदा थाटाने साजरा करू. शेजारच्या गावचे गवई बोलावू.”
आणि लग्नाचा वाढदिवस आला. बागेत तयारी करण्यात आली. सुंदर फुले फुलली होती. मध्ये गालिचा होता. रात्री मुख्य जेवण झाले. सुखदेव व सावित्री, शिरीष व करुणा तेथे होती. शिरीषचा मित्र प्रेमानंद तोही तेथे होता. गायनवादन सुरू झाले. आकाशात चंद्र होता. मंद वारा ཧवाहात होता. फुलांचा परिमळ सुटला होता. आनंदाला भरती आली होती.
“ करुणा, तू म्हण तुझे आवडते गाणे.” शिरीष म्हणाला.
“ माझा गळा चांगला नाही.” ती म्हणाली.
“ तुझा गळा मला गोड वाटतो. म्हण !”
आणि करुणेने आढेवेढे न घेता ते गाणे म्हटले
“ कर्तव्याचा जीवनात सुगंध ”
सत्प्रेमाचा जीवनात आनंद ॥ ध्रु० ॥
चिता नाहीं मातें
सेवा होई हातें
मुक्त आहे जरी संसार-बंध ॥ कर्त० ॥
भाग्य माझे थोर
नाही कसला घोर
प्रभु पुरवी माझे सारे संच्छंद ॥ कर्त० ॥”
परंतु ही कसलो तिकडे गडबड ! घोडेस्वार दौडत आहेत. टापटाप आवाज येत आहेत. सारे घाबरले. गाणे संपले. आनंद अस्तास गेला. तो पाहा एक दिवा मालवला, आणि चंद्रही खाली वळला. अंधार होणार वाटते !
“ काय रे शिरीष, काय आहे ?” पित्याने विचारले.