Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हुकमाचे पान

बदाम चौकट इस्पिक किलवर
कोण असावा हिचा दिलवर
असेल कोणी खत्रुड बिजवर
 काय करायचं रे तुला ?
 ... अंदाज बांधायची सवयच असते
 भल्याभल्या भलत्यांना

चौकट इस्पिक किलवर बदाम
असेल का याच्या खिशात छदाम
की मालामाल हा भरून गोदाम
 काय करायचं रे तुला?
 ...अंदाजावरच तर खेळायची खेळी
 प्रत्येक सोम्यागोम्याला.

इस्पिक किलवर बदाम चौकट
काही तरी इथं शिजतोय कट
पहिल्यापासूनच हा वाटतो हलकट
 काय करायचं रे तुला ?
 ...अंदाज चुकला तर फुका
 फास आमच्याच की हो नरड्याला

किलवर बदाम चौकट इस्पिक
साधलंच पाहिजे आपलं ईप्सित
याच्याकडेच हुकूम निश्चित
 काय करायचं रे तुला ?
...कर्तब नसता, छानछोकी हवी
तर डाव लागलाच पाह्यजे मला!

कबुतरखाना / ४३