Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमचं एकत्र कुटुंब रेशनकार्डावर फोडून
विभक्त करून घेण्यासाठी
अहमहमिका लावलीय

म्हाताऱ्या आईवडिलांना आम्ही 'एकाच घरात तुमची
चूल कशी वेगळी दाखवायची' याचं ट्रेनिंग देतोय,
गांधीजी ...
पण तुमच्या शिकवणुकीची लस लागलेली ही पिढी
भाबड्यासारखे काहीतरी अव्यवहारी प्रश्न विचारत रहाते, गांधीजी...
कुठल्या महाभागानं तुम्हाला इतकं साधं सरळ सोपं
रहायची दीक्षा दिली, गांधीजी ...
वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका, वाईट बोलू नका असा
संदेश देणाऱ्या तुमच्या त्या तीन माकडांनी तर
आता उच्छाद मांडलाय...

'वाईट ऐकू नका'वालं माकड कानावर हात ठेवून
आता वाईट बघतंय आणि वाईट्ट बोंबलतंय

'वाईट बघू नका'वालं माकड डोळ्यावर हात ठेवून
वाईटसाईट ऐकतंय आणि तेच रिपिट करतंय

'वाईट बोलू नका'वालं माकड तोंडावर हात ठेवून
कान देऊन वाईट ऐकत नुसतं बघत बसतंय

गांधीजी, तुम्ही
एकाच माकडाला सहा हात द्यायला हवे होते

म्हणजे दोन्ही कानांवर दोन हात

कबुतरखाना / ३३