पान:कधी न थांबलो.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाचायला द्यायच्या. त्यांच्याकडे राम मनोहर लोहिया संपादित मनकाईंडचे अंक नियमित येत. तेही मला वाचायला त्या देत असत. राष्ट्र सेवा दलाच्या वासंतिक शिबिरात अनेक समाजवादी विचारवंत निरनिराळे विषयांवर बौद्धिक घ्यायला यायचे. परंतु डॉ. राम मनोहर लोहियांची खरी ओळख त्या काळपर्यंत तरी कोणी करून दिली नव्हती. कमलताईंमुळे लोहिया आणि लोहियांच्या वाङ्मयाची ओळख झाली. लोहिया हे गांधीवादाचे कसे एक्सटेंशन होते हे त्यांची अनेक पुस्तके वाचल्यावर सहज लक्षात येते. इतर प्राध्यापकांना मात्र अशा वैचारिक राजकारणात फारसा रस नव्हता. त्यामुळे ते शिकविण्याशिवाय दुसरे काही करीत नसत. बी. श्री. कट्टी नावाचे वैद्य आम्हाला शिकवायला होते. तरुण, देखणा प्राध्यापक. छानच शिकवायचे. पण थोडेसे उजव्या विचारसरणीचे. विषयाचा मात्र गाढा अभ्यास. पैसे न घेता विद्यार्थ्यांना पहाटे शिकविण्यासाठी बोलवीत. मी त्यांच्याकडे काही वेळा पहाटे गेलो पण माझे मन पहाटे फिरणे, व्यायाम यातच जास्त रमायचे. त्या काळात नांदेड शहर आजच्या एवढे प्रचंड वाढलेले नव्हते. नवी-जुनी वस्ती मिळून एक दीड किलोमीटरच्या परिघात पसरले होते. शहरात राष्ट्र सेवा दलाच्या विचारांची अनेक कुटुंबे होती. अॅड. अग्रवाल, बियाणी, डॉ. ना. य. डोळे, नरहर कुरुंदकर, सुधाकर डोईफोडे अशा प्रमुख समाजवाद्यांचा परिचय तेथे गेल्यावरच झाला, समाजवादी पक्षाच्या निरनिराळ्या कार्यक्रमांत त्यांच्या भेटी-गाठी होत. अॅड. अग्रवाल तर आम्हाला आमच्या संघर्षाच्या कामातही मार्गदर्शन करीत होते. त्या काळात घडलेले रेल्वेचे संप, कोयना धरण फुटल्यावर निधी जमविण्यासाठीची चळवळ या सर्वांत विद्यार्थी म्हणून मी अग्रभागी होतो. त्यामुळे नांदेडच्या विद्यार्थी जगतात मला ओळखणारे बरेच विद्यार्थी होते. १९६१ मध्ये कॉलेज संपले. राष्ट्र सेवा दलाचा पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याऐवजी महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या हडपसर, पुणे येथे सुरू असलेल्या साने गुरुजी रुग्णालयात इन्टर्नशिप करण्यासाठी मी गेलो. हे रुग्णालयही राष्ट्र सेवा दलातील मंडळींनी चालविले होते. डॉ. बाबा आढाव, सि. तु. ऊर्फ दादा गुजर, डॉ. गोपाळ शहा इत्यादी डॉक्टर्स तेथे कामाला होते. त्यामुळे या व्यवसायाकडे बघण्याची आणि व्यवसायाचे व्यवस्थापन करण्याची नवी दृष्टी मला मिळाली. तेथे मी जवळपास दहा महिने काम केले. पन्नास रुपये मानधन आणि राहायला खोली असा माझा पगार होता. ४४ /कधी न थांबलो