पान:ओळख (Olakh).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाहेर शिल्लक राहू शकणार नाही. म्हणून ही जाणीव जीवशास्त्रीय आहे असे म्हणताच अलौकिकतावाद्यांचा पाया ढासाळून जातो. नंतर फक्त अलौकिकतावादच शिल्लक राहतो. आणि सौंदर्याची जाणीव कलात्मक व्यवहार हा प्राणिसष्टीचा वारसा नव्हे ते मानव या विकसित प्राण्याने निर्माण केलेले सांस्कृतिक संचित आहे असे जर आपणाला म्हणायचे असेल तर मग आपण असे म्हटले पाहिजे की, संस्कृतीने उपयोगितेची कसोटी लागू न पडणारे जे व्यवहार आपले माणूसपण जतन करण्यासाठी लौकिक व्यवहारातून महत्त्वाचे ठरविलेले आहेत त्यापैकी कलात्मक व्यवहार हा एक आहे. हा व्यवहार प्रत्यक्ष उपयोगी नसतो पण प्रत्यक्ष उपयोगी व्यवहाराहून अधिक महत्त्वाचा असतो. या व्यवहाराचे हे महत्त्व ज्या कसोट्यांच्या आधारे ठरवावे लागेल त्या पुन्हा लौकिक व्यवहाराने उपलब्ध करून दिलेल्या कसोटया असतात.

 कलामीमांसेला असा कुठे तरी एकण जीवनव्यवहारात या व्यवहाराचे स्थान काय? या प्रश्नाचा स्पर्श व्हावा लागतो. कलांची सांस्कृतिक फलश्रुती शून्य आहे हे सांगणे सोपे असते. पण कोणतेच महत्त्व नसणारा हा व्यवहार जतन का करावा हे सांगणे अवघड असते. पाटणकरांच्या विवेचनाशी असणारे माझे मतभेद या संक्षिप्त विवेचनावरून स्पष्ट व्हावेत. खरे म्हणजे हे मुद्दे क्लिष्ट वाटू नयेत म्हणून फारसे खोलात न जाता ज्या सैल पद्धतीने मी चचिलेले आहेत त्यापेक्षा ते अधिक रेखीवपणे चचिण्याची आवश्यकता आहे. पण कलामीमांसेच्या क्षेत्रात असल्याप्रकारची विविधता आणि मतभेद गहीतच असतात. पाटणकर कलाकृतींच्या आस्वादातील उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा आधार घेऊन मीमांसा करीत आहेत ही माझ्या मते अतिशय मोलाची गोष्ट आहे. कारण माझी अशी खात्री आहे की, यासारख्या प्रयत्नांतूनच सौंदर्यशास्त्र, कलासमीक्षा, कलाकृती आणि आस्वाद यांचा परस्पर अनुबंध स्पष्ट होईल. आणि निदान मराठीतील कलास्वरूपशास्त्र या प्रयत्नांमुळे समद्ध होईल.

१०५

ओळख