पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लैंगिकतेसंबंधीच्या आपल्या भ्रामक व पारंपरिक समजुतीमुळे आपणास मतिमंदांतील लैंगिकता हा यक्षप्रश्न वाटत आला आहे. मतिमंदांचे पालक व शिक्षक यांना लैंगिकतेसंबंधी सतत काळजी वाटत आली असल्याचे माझ्या लक्षात येते. मतिमंदांतील लैंगिकतेसंबंधी समाजाचा दृष्टिकोनही रोगापेक्षा इलाज भयंकर' अशा स्वरूपाचा असल्याचे दिसून येते. असे का व्हावे? मला वाटते की लैंगिकतेसंबंधी आपल्या मनात प्रचंड गैरसमज, अज्ञान भरलेले आहे. शिवाय अकारण आपण लैंगिकतेस एक गुप्त वा खासगी बाब मानत आलो आहोत. लैंगिकता हा एक ‘सहजोद्गार' आहे, हे लक्षात घेतले की त्यातील भयंकरपणा आपोआप दूर व्हायला मदत होईल. मतिमंदांतील लैंगिकता आपल्यादृष्टीने काळजीचा प्रश्न झाला आहे कारण आपण मतिमंदातील लैंगिकतेसंबंधी आपली परिमाणे त्यांच्यावर लादतो. म्हणजे असे की आपल्या समाजात लैंगिकतेसंबंधी रूढ अशा काही कल्पना पाय रोवून उभ्या आहेत. नेत्रपल्लवी करायची पण ती कुणाच्या लक्षात येता कामा नये. चोरून गुलूगुलू बोलायचे. कोणी नसताना मिठी मारायची. ओठ चुंबायचे, स्तन, नितंब, पाठ, गालास स्पर्श करायचा, कुरवाळायचे, दाबायचे, मिठी मारायची, शरीरसंबंध ठेवायचे इत्यादी. हे सर्व गुप्त, खाजगी करण्याची गोष्ट आहे, अशी एक रूढ कल्पना आपल्या मनात घर करून बसली आहे. शिवाय सामाजिक नैतिकता, शिष्टाचार यांचीही रूढ अशी बंधने आपल्या मनात घट्ट आहेत. मतिमंदांची स्वत:ची अशी मर्यादा असते. त्यांना सामान्य मुला-माणसांप्रमाणे सामाजिक रीतीभातीचे ज्ञान नसतं. ही गोष्ट खासगीत, गुप्तपणे कुणाला न कळता करायची असते, याची जाण नसते. शिवाय नातेसंबंधांची समजही त्यांच्यात सामान्यांपेक्षा कमी असते. मतिमंदत्वाची तीव्रता व क्षीणता व्यक्तिपरत्वे भिन्न असते. तीव्र मतिमंदात लैंगिक भावनांची रूढ जाण अत्यल्प असते. यामुळे मतिमंद मुले, मुली, युवक, प्रौढ यांचे लैंगिक व्यवहार आपणास काळजीचे वाटतात. मतिमंद, मुले-मुली शाळाघरात इतरांसमोर, आई-वडिलांशी, शिक्षकांशी व आपसात व व्यक्तिशः ज्या । प्रकारचे लैंगिक वर्तन वा व्यवहार करतात ते सामान्यांच्या दृष्टीने लज्जामय, संकोचक्षम, अशिष्टपणाचे वाटले तरी मतिमंदांच्या बाजूने विचार केला तर ते त्यांचे सहज व्यवहार असतात. आपल्याला ते अपराधी वाटतात. कारण आपणास सामाजिक नैतिकता, शिष्टतेचे जे भान असते, ते त्यांना मात्र नसते. हे एकदा लक्षात घेतले की मग त्यातील भयंकरपणा कमी होईल. आपल्याकडे लैंगिक व्यवहार अजून नैतिक व शिष्टसंमत व्यवहाराच्या जंजाळात अडकून वंचित विकास जग आणि आपण/५१