पान:उषःकाल.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बहाणा

श्वासाहून खरे
माझे हे निःश्वास
खात्रीचे आश्वास । उच्चारती ॥

माझ्या या मनाची
मनोबंद खात्री
जाहली धरित्री । पावसाळी ॥

प्रथम दृष्टीत
ठसलास तेव्हा
श्वासही सव्वा । घेतला मी ॥

एकदा आलास
भरून आभाळ
घामाने हे भाळ । डवरले ॥

भेटशी एकदा
काहिली उन्हात
मावेना मनात | सावली ती ॥

असाच एकदा
सावरला तोल
शक्ती माझी फोल । असूनही ॥

क्षण संकटाचे
वरी विजयाचे
सामर्थ्य जयाचे । जाणते मी ॥

कोठे का असेना
सृष्टीचा तू राणा

तुझा तो बहाणा । दिपवितो ॥

उषःकाल । २५