Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानल्याशिवाय भोजन करून उठत नसत. दिवसा जेव्हां प्रार्थनेत मग्न नसतील तेव्हां पाहुण्यांच्या भेटी मुलाखती घेत. सार्वजनिक कामकाज बघत.
 फार झोंपत नसत. बहुतेक वेळ प्रार्थनेत दवडीत. प्रार्थना त्यांचा प्राण होता. झोंपेपेक्षां प्रार्थना बरी, असें ते नेहमी म्हणत. कट्ट्या शत्रूजवळहि त्यांचे वर्तन उदार व दिलदार असे. त्यांनीं सूड कधींच घेतला नाहीं. राष्ट्राच्या शत्रूंचे बाबतींत अति झाले म्हणजे ते कठोर होत. त्या प्रेमसिंधूला परिस्थितींमुळे कठोर व्हावें लागे. वास्तविक त्यांचे जीवन प्रार्थनामय होतं, प्रभुमय होतें. साधा आहार, झोपायला कठिण चटई, फाटके कपडे व तुटलेल्या वहाणा शिवणें! ते वैराग्य, ती अनासक्ति, ती क्षमा, ती ईश्वरार्पणता, तें हिमालयाचें धैर्य ती समुद्राची गंभीरता, ती निरपेक्ष दया, ती सरळता. कोठे पहाल हे गुण? समुद्राच्या तळाशी मोठीं मोतीं सांपडतात. महात्म्यांजवळच असे गुण आढळतात.
 त्यांचे मन अर्वाचीन होते. ते बुद्धिप्रधान होते, प्रगतिशील होते. नवीन कल्पना घेणारे व्यापक मन होते. संकुचितपणा त्यांना माहित नव्हता. मानवी जीवन म्हणजे उत्तरोत्तर विकासार्थ अमर धडपड! इन्किलाब झिन्दाबाद. ते नेहमी म्हणत, "सतत प्रयत्नांशिवाय मनुष्य जगूं शकणार नाहीं. प्रयत्न माझें काम, फळ प्रभु हातीं." कुराणांत एके ठिकाणीं सांगतात, "तुम्ही स्वतःची बदलण्याची धडपड सुरू करा. मग प्रभु धांवेल."
 मुहंमदांनी ज्या विश्वाची कल्पना दिली, तींत गोंधळ नाहीं. त्या विश्वांत व्यवस्था आहे. विश्वातीत व विश्वव्यापी चैतन्य या विश्वाचें नियमन करीत आहे. मुहंमद एकदां म्हणाले, "प्रत्येक वस्तु कालानुरूप आहे. काल एक वस्तु अनुरूप असेल ती उद्यां असेल असें नाहीं. ईश्वर शेवटी योग्य तेच करील." असें जरी ते म्हणत तरी त्यांनी मनुष्य-प्रयत्नाला वाव ठेवला आहे. आपण प्रयत्न करावे. देवाला जे प्रयत्न फुलवायचे, फळवायचे असतील ते फुलवील, फळवील. मानवाला इच्छास्वातंत्र्य, कर्मस्वातंत्र्य, प्रयत्नस्वातंत्र्य आहे. पैगंबरांची सहानुभूति सर्व भूतमात्रांसाठी. त्यांनी सर्व प्राणिमात्रांसाठीं प्रभूची करुणा भाकली. एका मानवाला वांचविणें म्हणजे सर्व मानव जातीला वांचविणें आहे असें ते म्हणत. समाजाचे एकीकरण करणारे ते होते. ते जोडणारे होते. अति उच्च, उदात्त असें तें मन होतें. तरीहि कौटुंबिक जीवनाचे पावित्र्य विसरत नसत. मानवाची सेवा

इस्लामी संस्कृति । १५९