Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येऊ." असा त्याने निरोप पाठविला. तो निरोप ऐकून मुहंमद म्हणाले, "आमच्याबरोबर परमेश्वर आहे तेवढा पुरे. तोच खरा संरक्षक!"
 आसपासच्या टोळ्याहि मदिनेस आतां वरचेवर त्रास देऊ लागल्या. मुहंमदांनी ताबडतोब या गोष्टीचा बंदोबस्त केला. कांहीं जमाति 'आम्हांस उपदेश करायला कोणी पाठवा. आम्ही मुसलमान होऊं' असा निरोप पाठवीत. परंतु प्रचारक गेले की, त्यांची कत्तल करीत. एकदां असे सत्तर जण मारले गेले. नवधर्माची सत्त्वपरीक्षा प्रभूनें चालविली होती. बलिदानाचा पाया घातला जात होता. शुद्ध बी पेरले जात होतं.
 एकदां बनी आमिर जातीचे दोन निःशस्त्र लोक मुहंमदांपासून संरक्षण घेऊन जात होते. परंतु मुहंमदांच्या एका अनुयायाकडून चुकीनें ते शत्रुपक्षाचे समजून त्यांतील एक जण मारला गेला. मुहंमदांनी त्याच्या कुटुंबास नुकसानभरपाई देण्याचे ठरवलें. मदिनेत मुहंमद 'दियत' म्हणजे नुकसानभरपाईची रक्कम गोळा करूं लागले. ते ज्यूंजवळ हि मागायला गेले. परंतु ज्यू टाळाटाळी करूं लागले. इतकेंच नव्हे तर मुहंमदांस दगा करण्याची त्यांची लक्षणे दिसूं लागली. मदिनेंतील लोकसत्तेविरुद्ध ज्यू कारवाया करूं लागले. ते बाहेरच्या जातिजमातींनाहि चिथावणी देऊन उठवू लागले. पैगंबरांनी दोघांना मरणाची शिक्षा दिली. शहरांत दंगाधोपा होऊ नये, रक्तपात टाळावा, परंतु शासनहि व्हावे या हेतूनें या दोघांचा निमूटपणे अज्ञात माणसाकडून वध करण्यांत आला! त्या वेळेस कोर्ट, कचेऱ्या, कोर्ट मार्शल किंवा इतर शांततेच्या काळांतील सुव्यवस्था नव्हती. म्हणून मुहंमदांस असें करावें लागलें. ते फसवून खून नव्हते करवले. तर ती शिक्षा देण्यांत आली होती! बनी कैनुकाच्या लोकांस मदिनेतून हाकलून देण्यांत आले. त्याचे कारण असें झाले की एकदां एक मुस्लिम कुमारी बाजारांतून जात असतां एका ज्यूनें तिचा अपमान केला. एका जाणाऱ्या मुस्लिमानें मुलीची बाजू घेतली. तो ज्यू झटापटीत मारला गेला. इतर ज्यू धांवून आले. तो मुसलमानहि मारला गेला. तेथे लढाईच सुरू झाली. मुहंमद तेथे धांवून आले. त्यांनी सर्वांना शांत केलें. परंतु मदिनेचे वातावरण शांत कसे होणार? तेव्हां मुहंमदांनीं या ज्यूंना जायला सांगण्याचे ठरवले. बनी कैनुकाचे लोक हे कारागीर वर्गाचे होते. त्यांची शेतीभाती वगैरे नव्हती. तेव्हां त्यांना जा म्हणून
१०८ ।