Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





भावनात्मक ऐक्याला उपकारक ग्रंथ
उपराष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन यांच्या इंग्रजींतील संदेशाचा मराठी अनुवाद

साने गुरुजींच्या इस्लामी संस्कृतीवरील ग्रंथाचा पहिला खंड २४ डिसेंबर १९६४ ला, लेखकाच्या जन्मदिवशीं, प्रसिद्ध होत आहे याबद्दल मला फार आनंद वाटत आहे. साने गुरुजींच्या चाहत्यांनी त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी ठरविलेला हा कार्यक्रम अन्य कोणत्याहि कार्यक्रमापेक्षा अधिक औचित्यपूर्ण आहे. साने गुरुजी एक निष्ठावान शिक्षक म्हणून सुपरिचित आहेत. राष्ट्र सेवा दलाच्या संस्थापकांत त्यांची गणना होते. असंख्य तरुणांचीं मनें त्यांनी घडवली.
 साने गुरुजींनी विपुल लेखन केले आणि साधना साप्ताहिक व साधना प्रकाशन यांची संस्थापना केली. या साहित्यसाधनेतून, लोकशाही जीवनपद्धतीसाठी आवश्यक असणारें अधिष्ठान जें जागृत लोकमत, तें निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले. आपल्या राष्ट्राच्या जीवनांतील वेगवेगळी वैशिष्टयें असणाऱ्या घटकांना एकमेकांची खरीखुरी ओळख पटावी व त्यांतून त्यांच्यांत स्नेह निर्माण व्हावा ही साने गुरुजींच्या मनांतील एक प्रबळ प्रेरणा होती. मला वाटतें या प्रेरणेमुळेच, स्वातंत्र्यसंग्रामांत भाग घेतल्याबद्दल धुळे तुरुंगांत

इस्लामी संस्कृति