Jump to content

पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चर्चेमधून शेवटी सत्य उमजून येते.
 आपली चर्चा देह-मन-संबंधाशी निगडीत आहे.तेव्हा त्याला अनुलक्षूनच ही असल्याने तशी ती सीमितच आहे.आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला, अवयवाला एक भाषा आहे.रक्ताची सुद्धा एक भाषा आहे.हिप्पोक्रॅटसच्या लिखाणात त्याने असे म्हटले आहे की, संपूर्ण शरीरात जाणीवपूर्वक विचारांचे अस्तित्व जाणवते.हर्ममन हेस म्हणतो की “माझे रक्त कुजबुजीच्या स्वरूपात ज्ञानदान करत असते.हल्ली मी सर्व गोष्टी सोडून त्या कुजबुजीच्या स्वरूपातील संवाद लक्षपूर्वक ऐकत असतो.” ही काही कविकल्पना नाही.अनेक वैचारिक लेखक आणि ऋषीमुनींनाही याची जाणीव होती.आज विज्ञानाद्वारा आपणास हे माहीत झाले आहे की मेंदूतील काही पेशी काही रसायनांची निर्मिती करत असतात. ही रसायने माहीत झाल्यामुळे आपण कसा विचार करतो, आपली मानसिक स्थिती जी सतत बदलत असते ती आपण जाणू शकतो.डिप्रेशन, उलघाल, शांती, भीती, चिंता अशा अनेक भावनांचा संबंध ह्या रसायनांशी असतो. यांना शास्त्रीय भाषेत 'न्यूरोपेप्टाईडस्'(Neuropeptides) व ‘न्युरोट्रॅन्समीटर्स'(Neurotransmitters) असे म्हटले जाते.अनेक अशा रसायनांचा आज शोध लागला आहे.पुढेही लागेल.पण अशी रसायने फक्त मेंदूच निर्माण करत नाही तर रक्तातील पेशीही करू शकतात.यापैकीच काही म्हणजे ‘एन्डॉर्फिन्स्' (Endorphins).ही रसायने वेदनाशमन व भाव- भावनांशी निगडीत आहेत.ह्या गोष्टी पाहिल्या की अशी खात्री होते की फक्त डोक्याच्या कवटीच्या आतच मेंदू नसून त्याबाहेरही शरीरात मेंदू आहे. पहिला म्हणजे शरीरशास्त्रानुसार डोक्याच्या कवटीत असणारा व दुसरा प्रकार म्हणजे मेंदूसारखंच काम करणारा,देहामध्ये अस्तित्वात असलेला, अनेक पेशीत असणारा.प्रत्यक्ष मेंदूची रचनाही आपण जाणतो.दुसरा प्रकार म्हणजे मेंदुसमान कार्य करणारे टिश्यू व एन्डॉर्फिन सारखी रसायने.रक्तपेशीसुद्धा विचार करू शकतात, बोलतात,हे पाहिले म्हणजे हा दुसरा मेंदू जणू शरीरभर प्रवास करणारा दूत आहे व याचा असा अर्थ होतो की मन हे फक्त मेंदूतच नसून सर्व शरीरभर आहे.हा विचार अर्थातच देहापुरता आहे.

 आपल्याकडे 'खाण तशी माती', किंवा पापी माणसांचे बाबत 'करावे तसे



१६