पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.

 व्यापारादि निमित्तानें राष्ट्रांचा एकमेकांशी संबंध होऊं लागला म्हणजे परस्परांच्या पोषाखपेहरावांची, खाण्यापिण्याच्या पदार्थोची, चालीरीतींची, आचाराविचारांची अनुक्रमें अदला-बदल होत जाते. त्या अदलाबदलींत कमीजास्तपणा वारंवार दिसून येतो. जें राष्ट्र संपत्तीच्या, सत्तेच्या, किंवा विद्वत्तेच्या मानानें श्रेष्ठ तें कमी योग्यतेच्या राष्ट्रांपासून फारसें घेत नाहीं. तथापि, ती क्रिया कांहीं प्रमाणानें तरी होत असते. ह्या अदला- बदलीचें आदि कारण मनुष्यस्वभाव होय. केवळ नूतनपणाचा हव्यास मनुष्यास असल्यामुळे बरें वाईट ह्मणून नवीन दिसेल तेवढें शक्त्यनुसार मनुष्य स्वीकारितो. ह्या अदलाबदलीचा प्रभाव कोणत्याही राष्ट्राचा इतिहास बारीक दृष्टीने वाचल्यास सहज लक्षांत येऊन चुकेल. पुरातनकाळीं च्यांशीं संबंध घडला त्यांच्यापासून त्यांनीं काय काय घेतलें हैं सांगण्यास आर्याचा ज्यांच्याशी स्वतंत्र निबंध पुरा होणार नाहीं; तेव्हां फार लांबच्या काळचा विचार न करितां, मोंगलाईचें उदाहरण घेऊं. मोंगलाईच्या वेळीं हिंदुलोकांनीं राज्यकर्त्यांच्या बऱ्याच चाली-रीती उचलल्या. त्यांत गोषा हें ढळढळीत उदाहरण होय. बाकी खाण्यापिण्याच्या पदार्थात, पोषाखपेहरावांत, फार तर काय व्यवहार, भाषा, धर्म इत्यादींत देखील मोंगलाईचें वारें दिसून येतें. शब्दव्युत्पत्तीचा जर अभ्यास केला तर ह्या संबंधाचा परिणाम विशेष लक्षांत येईल. असो; १७ व्या शतकापासून युरोपीय लोकांशी आपला संबंध होऊं लागला. पुढे कालावसानेंकरून इतर सर्व नुरोपीय लोक पराभूत झाल्यामुळे देश सोडून गेले. फक्त इंग्रज