पान:आमची संस्कृती.pdf/165

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१५८ / आमची संस्कृती

उजळणी होई. सर्व अभ्यास झाला म्हणजे शिकवलेले सर्व विषय उत्तम विद्याथ्र्याला तोंडपाठ असत व इतरांना फारच थोडे तोंडपाठ असे.
 ह्या शिक्षणपद्धतीच्या गुणदोषांचे सविस्तर वर्णन करण्याचे आपल्याला कारण नाही. पण ही पद्धत शक्य होण्यासाठी मोजका अभ्यास, मोजके विद्यार्थी, शिकवण्याला व शिकण्याला भरपूर वेळ अशा तीन गोष्टी आवश्यक होत्या. वयाच्या आठव्या वर्षी अभ्यास सुरू करून बारा वर्षे कमीत कमी व चोवीस ते छत्तीस वर्षे जास्तीत जास्त त्यांत घालवण्याची तयारी पूर्वी असे.
 हे शिक्षण जरी तोंडी असे तरी त्याला पुस्तकी म्हणण्यास हरकत नाही. इतिहास (पुराणरूपाने), व्याकरण, न्याय, मीमांसा, तत्त्वज्ञान ह्या स्वरूपाचे हे शिक्षण असे. भारतीयांच्या वैचारिक संस्कृतीबद्दल ते होते. प्रत्यक्ष जीवनोपयोगी कला जो तो आपापल्या कुटुंबातील किंवा जमातींतील वृद्धांकडून शिकत असे. त्यासाठी इतकी वर्षे खर्च करावी लागत नसत. पण तेथेही कसबाच्या परीक्षा त्या त्या कारागीर संघाकडून घेतल्या जात.
 पूर्वी जातीवर आधारलेली समाजव्यवस्था असे. काही विशिष्ट जातींनाच सांस्कृतिक शिक्षण घेण्याचा अधिकार असे. त्या जातींतही बहुसंख्य लोक थोडेसे म्हणणे' व गृहस्थाश्रमाची नित्य व नैमित्तिक कार्ये पार पाडण्याइतपत शिकत व अगदी थोडे गुरुगृही राहून कष्टाने विद्या साध्य करीत. समाजातील बहुसंख्य लोकांना सांस्कृतिक शिक्षण तर नव्हतेच पण अक्षरांचीसुद्धा ओळख नव्हती.
 ह्या जुन्या समाजव्यवस्थेतून निघून मानवी समतेच्या तत्त्वावर आधारलेल्या एका नव्या समाजरचनेकडे आपण जात आहोत. कोणीही मनुष्य पोटासाठी कसलाही उद्योग करीत असला तरी त्याला लेखन, वाचन व थोडे सांस्कृतिक शिक्षण मिळाले पाहिजे असा हल्ली कटाक्ष आहे व त्यामुळे शिक्षण घेण्याला योग्य अशा सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण तर मिळाले पाहिजेच पण दुय्यम व उच्च शिक्षणही शक्य तितक्या जास्त लोकांनी घ्यावे अशी व्यवस्था करण्यास आपण झटत आहोत. पूर्वी कधीही नाही इतक्या संख्येने आज शिक्षणाच्या सर्व शाखांतून विद्याथी शिक्षण घेत आहेत व संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार. ह्या विद्यार्थ्यांना