पान:आपले आभाळ पेलताना.pdf/७४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 गीता गावातच राहात होती अधुन-मधून संस्थेत येत असे. नंतर सासरच्या गांवी गेल्याचे कळले. आज पाच वर्षानंतर दोन मुलांना घेऊन गीता समोर उभी राहिली. हातात अर्ज होता.
 "मी गीता मधुकर पाखरे मनस्विनीच्या दिलास घरात राहात होते तिथेच माझे लग्न झाले. आता मी सासरी आनंदात आहे. मला दोन मुले आहेत. माझे जोडीदार मधुकर, पुणे येथे दापोडीस काम करतात. मी गावी सासू-सासऱ्यांसह रहाते. शेतमळा सांभाळते. माझ्या वडिलांनी माझ्या भावांच्या नावे १२ एकर शेत करुन दिले. उरलेले सहा एकर शेत माझे नावे करुन देतो म्हाणतात. माझे भाऊ त्यांना सांभाळत नाहीत. त्यांचे फार हाल होतात. वडिलांची इच्छा माझ्याजवळ राहाण्याची आहे. मधुकरांच्या कानावर मी त्यांची इच्छा घातली. त्यांनी व मी असे ठरवले की तुम्हाला भेटून निर्णय घ्यावा. कृपया मला याबाबत सहकार्य करावे ही विनंती.

आपली
-गीता मधुकर पाखरे.


 मोफत कायदा आणि कुटुंबसल्ला मदत केंद्राच्या रीतीनुसार आम्ही तिचे आई-वडील, जोडीदार, सासू-सासरे या साऱ्यांची एक बैठक घेतली, चर्चा केली.

 गीताच्या मनात वडिलांविषयीचा राग आलेला परत दाटलेला होता. घरात आईला होणारा जाच तिने जवळून पाहिला होता. भावांचे लाड तर आई नि वडील नको तितके करीत. दोघांनी शिक्षण अर्ध्यातून सोडले होते. एकाला मटक्याचा नाद होता. दुसऱ्याची बायको जळून मेली होती. गीताच्या मनात आई विषयी पण आढी होती. तिला वाटे की, आई सुनेशी नीट वागली असती, मुलाला धाकात ठेवले असते तर तिने जीव दिला नसता. गीताच्या विवाहानंतर गेल्या नऊ-दहा वर्षात माहेरच्यांनी कधी तिची दखल घेतली नव्हती. बाप्पावर नि गीतावर घाणेरडा संशय घेणारे वडील, बाप्पांना घेऊन गीताच्या दारात आले होते. आपले दुःख सांगताना भडभडा रडलेही होते. पहिल्या भेटीत वडिलांना जेऊखाऊ घालून, शंभर रुपये खर्चाला देऊन पण "आता तरी माझा संसार नासवायला येऊ नका " असे ठामपणे बजाऊन त्यांना माघारी धाडले होते.

 मधुकर पुण्याहून आल्यावर तिने त्यांच्या कानावर सारी हकीगत

आपले आभाळ पेलताना/७२